चीन आणि रशिया अमेरिकेच्या उपग्रहांवर हल्ले चढवतील – अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर विभागप्रमुखांचा इशारा

चीन आणि रशिया अमेरिकेच्या उपग्रहांवर हल्ले चढवतील – अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर विभागप्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेचे उपग्रह नष्ट करण्याचे सामर्थ्य चीन व रशियाकडे आहे. सध्या हे दोन्ही देश अंतराळ क्षेत्रात शांततेचा पुरस्कार करीत असले तरी युद्धाच्या काळात परिस्थिती वेगळी असेल. अमेरिका मोठ्या प्रमाणात लष्करी व खाजगी उपग्रहांवर अवलंबून आहे, हे ठाऊक असलेले चीन व रशिया उपग्रहभेदी क्षेपणास्त्रे, एनर्जी वेपन अथवा लेझर, सायबर जॅमिंग आणि अंतराळातील इतर उपग्रह वापरून अमेरिकेच्या उपग्रहांना नष्ट करू शकतात, असा परखड इशारा अमेरिकी लष्कराचे गुप्तचर विभागप्रमुख लेफ्टनंट जनरल रॉबर्ट अ‍ॅश्‍ले यांनी दिला.

गेल्या तीन महिन्यांमध्ये अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने सिनेटला दिलेला हा तिसरा इशारा ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकन सिनेटच्या ‘आर्मड् सर्व्हिसेस कमिटी’समोर बोलताना लेफ्टनंट जनरल अ‍ॅश्‍ले आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे अध्यक्ष ‘डॅन कोट्स’ यांनी अमेरिकेच्या अंतराळातील वर्चस्वाला चीन व रशियाचे मोठे आव्हान असल्याची आठवण करून दिली.

सध्या अंतराळात भ्रमण करीत असलेल्या हजारो उपग्रहांपैकी फक्त ३७.५ टक्के म्हणजे १७३८ उपग्रह कार्यरत असल्याचा दावा केला जातो. यामध्ये अमेरिकेच्या सुमारे सहाशे उपग्रहांचा समावेश असून चीन व रशियाचे अनुक्रमे १७७ व १३३ उपग्रह सक्रिय आहेत. त्यामुळे अंतराळ क्षेत्रावर सध्या अमेरिकेचे वर्चस्व आहे. पण अमेरिकेचे हे वर्चस्व फार काळ टिकणार नाही, अशी चिंता लेफ्टनंट जनरल अ‍ॅश्‍ले आणि कोट्स यांनी व्यक्त केली. चीन-रशियाला अंतराळक्षेत्रातील ही विषमता मान्य नसून अमेरिकेला आपल्या स्तरावर आणण्यासाठी हे दोन्ही देश उपग्रहभेदी क्षेपणास्त्रांचा वापर करू शकतात, असा इशारा अ‍ॅश्‍ले आणि कोट्स यांनी दिला.

अशाप्रकारचे हल्ले अमेरिकेची ‘जीपीएस’ यंत्रणा तसेच उपग्रहांवर आधारीत तंत्रज्ञान कोसळवू शकतात. असे झाले तर अमेरिकेच्या सरकारी, लष्करी आणि व्यावसायिक यंत्रणा पूर्णपणे कोलमडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी केला. अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी चीन-रशियाची उपग्रहभेदी क्षेपणास्त्रे पुढच्या काही वर्षात अंतराळात झेपावू शकतात, असे कोट्स यांनी सिनेटसमोर सांगितले. काही दिवसांपूर्वी चीनने अमेरिकेला तसा इशारा दिला होता, याची आठवण कोट्स यांनी करून दिली.

अमेरिका व तैवानमधील सहकार्यावर चीन आक्षेप घेत आहे. यानंतरही अमेरिकेने तैवानला सहाय्य देणे सुरू ठेवले तर चीन आपल्या अंतराळ सामर्थ्याचा वापर करू शकतो, अशा सूचक शब्दात चीनने काही दिवसांपूर्वी अमेरिकेला धमकावले होते, याकडे कोट्स यांनी लक्ष वेधले. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही महिन्यांपूर्वी अंतराळातील वर्चस्वासाठी अमेरिकेच्या उपग्रहांवर हल्ल्याची धमकी दिली होती,
याचा दाखला लेफ्टनंट जनरल अ‍ॅश्‍ले यांनी दिला.

याआधीही अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी रशिया व चीनच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्रांचा धोका अधोरेखित केला होता. अमेरिकेचे उपग्रहांवरील अवलंबित्व येत्या काळात अमेरिकेसाठी सर्वात मोठी अडचण ठरेल, असे अमेरिकेच्या वरिष्ठ सिनेटरने दोन महिन्यांपूर्वी बजावले होते. यासाठी अमेरिकेने आपल्या अंतराळातील उपग्रहांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, असे आवाहनही पेंटॅगॉनच्या अधिकार्‍यांनी केले होते. याकरीता पेंटॅगॉनच्या संरक्षणखर्चात प्रस्तावित वाढ मंजूर करावी, अशी मागणी ट्रम्प प्रशासनाने सिनेट तसेच प्रतिनिधीगृहाकडे केली आहे.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)