सिरियातील इराणच्या जवानांचा बळी घेणार्‍या इस्रायलला मोठी किंमत चुकती करावी लागेल – – इराणच्या वरिष्ठ नेत्याचा इशारा

सिरियातील इराणच्या जवानांचा बळी घेणार्‍या इस्रायलला मोठी किंमत चुकती करावी लागेल – – इराणच्या वरिष्ठ नेत्याचा इशारा

तेहरान – सोमवारी सिरियाच्या होम्समध्ये इस्रायलने हवाई हल्ले चढवून इथल्या लष्करी तळाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात इराणचे सात जवान ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर इराणची प्रतिक्रियाही आली असून इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी यांच्या सल्लागारांनी इस्रायलला याचे कडक शासन केले जाईल, असे धमकावले आहे. 

सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी  यांचे वरिष्ठ सल्लागार असलेले अली अकबर विलायती मंगळवारी सिरियात दाखल झाले आणि त्यांनी होम्स येथील लष्करी तळाला भेटही दिली. यावेळी बोलताना विलायती यांनी इराणच्या जवानांचा बळी घेणार्‍या इस्रायलला याची मोठी किंमत चुकती करावी लागेल असे बजावले. या जवानांचे बलिदान इराण वाया जाऊ देणार नाही, असे सांगून इस्रायलच्या विरोधात इराण कठोर कारवाई करील, असे विलायती म्हणाले.

दरम्यान, इराणच्या कारवाईची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलने आधीपासूनच आपली लष्करी सिद्धता वाढविली आहे. एका दिवसापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आपल्या देशाचा घात करण्यासाठी टपलेल्या प्रत्येकावर हल्ले चढविले जातील, असे बजावले होते. यावर इराणच्या प्रतिक्रियेची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलने आपली सतर्कता वाढविल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या  आहेत. 

इस्रायल सध्या हाय अ‍ॅलर्टवर असल्याचे वृत्त या देशातील माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)

leave a reply