दमास्कस – अमेरिकेची प्रगत विनाशिका ‘युएसएस डोनाल्ड कुक’ सिरियातील तार्तूस या रशियन संरक्षणतळानजिक दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘टॉमाहॉक’ क्षेपणास्त्रांची तैनाती असलेल्या या विनाशिकेवर रशियन लढाऊ विमानांनी धोकादायकरित्या घिरट्या घातल्याचा दावा तुर्की वृत्तसंस्थांच्या हवाल्याने देण्यात आला आहे. मात्र अमेरिकी संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ने हे वृत्त फेटाळले आहे.
सिरियानजिकच्या सागरी क्षेत्रात अमेरिकी युद्धनौका दाखल झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेची ‘बर्क क्लास गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर’ युएसएस डोनाल्ड कुक, सोमवारी सायप्रसच्या ‘लॅर्नाका’ बंदरावरून निघून सिरियानजिकच्या सागरी क्षेत्रात दाखल झाली आहे. सिरियातील रशियाचा संरक्षणतळ असणार्या ‘तार्तूस’पासून ‘युएसएस डोनाल्ड कुक’ अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर रशियन लढाऊ विमानांनी अमेरिकी विनाशिकेनजिक घातलेल्या घिरट्या खळबळ उडविणारी घटना ठरते. तुर्कीच्या वृत्तसंस्थांकडून याबाबत दावे करण्यात आले आहेत. मात्र त्याला कोणत्याही बाजूकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. तुर्की वृत्तसंस्थेच्या दाव्यात रशियन लढाऊ विमानांनी अमेरिकी विनाशिकेवर चार वेळा उड्डाण केल्याचे सांगण्यात आले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाने याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. ‘युएसएस डोनाल्ड कुक’ भूमध्य समुद्रात असून सायप्रसपासून पुढील प्रवास चांगला झाला, अशी माहिती ‘पेंटॅगॉन’च्या निवेदनात देण्यात आली. तुर्कीच्या प्रसारमाध्यमांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले. रशियाने याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.
त्याचवेळी अमेरिकेची ‘युएसएस पोर्टर’ ही दुसरी विनाशिकाही सिरियानजिक दाखल होत असल्याचे वृत्त समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी ‘युएसएस पोर्टर’ने स्पेनचा किनारा सोडला असून ती कोणत्याही क्षणी सिरियानजिकच्या भूमध्य सागरी क्षेत्रात दाखल होईल, असा दावा करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या दोन प्रगत विनाशिका सिरियानजिक दाखल होणे ही पुढील कारवाईची सज्जता असल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या दोन विनाशिकांनी सिरियातील तळावर क्षेपणास्त्रहल्ले चढविले होते. त्यात ‘युएसएस पोर्टर’ व ‘युएसएस रॉस’ चा समावेश होता.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)