वॉशिंग्टन – ‘अमेरिकेने सिरियावर हल्ला चढविला, तर रशिया या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. अमेरिकेने सिरियावर डागलेली क्षेपणास्त्रे रशियाकडून भेदली जातील’, असे रशियाने अमेरिकेला बजावले होते. हे आव्हान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारले. ‘‘अमेरिकेची ‘नाईस’, ‘न्यू’ आणि ‘स्मार्ट’ क्षेपणास्त्रे लवकरच सिरियाचा वेध घेतील. रशियाने त्यासाठी सज्ज रहावे’’, अशी गर्जना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. यामुळे कुठल्याही क्षणी सिरियात विविध देश आणि देशांच्या आघाड्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे पर्यावसन महायुद्धात होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
रविवारी सिरियाच्या ईस्टर्न घौतामधील दौमा येथे रासायनिक हल्ला झाला व यात ८० जणांचा बळी गेला. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद यांची ‘जनावर’ म्हणून संभावना केली होती. तसेच सिरियन राष्ट्राध्यक्षांना साथ देणारे रशिया व इराण या देशांनाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता. या रासायनिक हल्ल्यात रशियाचा हात असेल, तर रशियालाही याचे परिणाम भोगावे लागतील, असे ट्रम्प यांनी बजावले होते. यावर रशियन नेतृत्त्वाने ट्रम्प यांना आव्हान देणारी विधाने केली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले आणि रशियाचे राजदूत वॅसिली नेबेंझिया यांची चकमक उडाली होती.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सोबत किंवा राष्ट्रसंघाच्या शिवाय अमेरिका सिरियावर लष्करी कारवाई करील, असे अमेरिकेच्या राजदूत हॅले यांनी बजावले होते. तर अमेरिकेच्या सिरियावरील हल्ल्याला आपल्याकडून प्रत्युत्तर देईल, अशी धमकी रशियाने दिली होती. अमेरिकेने सिरियावर क्षेपणास्त्रे डागलीच, तर रशिया ही क्षेपणास्त्रे भेदल्यावाचून राहणार नाही, असे रशियाने जाहीर केले होते. त्याचवेळी रशियन नेते, लष्करी व राजनैतिक अधिकारी अमेरिकेने सिरियावर हल्ला चढविल्यास, रशियाने त्याला प्रत्युत्तर द्यावे, अशी आक्रमक मागणी करू लागले आहेत. रशियाने ही भूमिका स्वीकारल्यानंतर, सिरियावर लष्करी कारवाईचा इशारा देणार्या अमेरिकेकडून माघार घेतली जाईल का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षात आपला देश माघार घेणार नाही असे ठणकावले असून त्यांनी रशियाचे आव्हान अमेरिकेने स्वीकारल्याचे दाखवून दिले.
‘‘अमेरिकेने सिरियावर क्षेपणास्त्रे डागल्यास, रशियाने ही क्षेपणास्त्रे भेदली जातील, असे म्हटले होते. तर मग आता अमेरिकेच्या उत्तम, नव्या आणि स्मार्ट क्षेपणास्त्रांसाठी रशियाने सज्ज व्हावे. कारण ही क्षेपणास्त्रे लवकरच येत आहेत’’, असा ‘संदेश’ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. आपल्याच जनतेवर रासायनिक हल्ले चढवून त्यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणार्या जनावरांच्या बाजूने रशियाने उभे रहायला नको होते, असा ठपका ठेवून ट्रम्प यांनी रशियाला त्याच्या भीषण परिणामांची जाणीव या पोस्टमधून करून दिली.
ट्रम्प यांच्या या पोस्टची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरात खळबळ माजली. ट्रम्प यांनी युद्धगुन्हेगारी करणार्या सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद यांना ‘टार्गेट’ करावे, अशी मागणी अमेरिकेचे लोकप्रतिनिधी करीत आहेत. तर ट्रम्प यांच्या या इशार्याच्या काही काळ आधीपासूनच अमेरिकेने व अमेरिकेच्या मित्रदेशांनी सिरियाला लक्ष्य करण्यासाठी सामरिक हालचाली सुरू केल्या आहेत. तर रशियाही अमेरिकेबरोबरील युद्धासाठी आपण सज्ज असल्याचा संदेश सार्या जगाला देत आहे.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)