अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका सिरियाच्या दिशेने

अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका सिरियाच्या दिशेने

वॉशिंग्टन – अमेरिकी नौदलाची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस हॅरि ट्रुमन’ उत्तर युरोपमधून भूमध्य समुद्राच्या दिशेने रवाना झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सिरियावरील हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर या विमानवाहू युद्धनौकेचा सिरियाच्या दिशेने सुरू झालेला प्रवास अमेरिकेच्या आक्रमक डावपेचांचे संकेत देत आहे. ‘युएसएस ट्रुमन’सोबत अमेरिकी नौदलाच्या सात विनाशिका असून जर्मन नौदलाची एक विनाशिकाही या ताफ्यात सहभागी झालेली आहे.

वर्षभरापूर्वी सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाला त्यावेळी अमेरिकेने सिरियाच्या शैरयात लष्करी तळावर ६० हून अधिक टॉमाहॉक क्षेपणास्त्रे डागली होती. ही क्षेपणास्त्रे अमेरिकी नौदलाच्या एका विनाशिकेवरून सोडण्यात आली. अशाच टॉमाहॉक क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार्‍या विनाशिका ‘युएसएस ट्रुमन’सोबत आहेत. त्यामुळे अमेरिका सिरियावर पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांचा जबरदस्त मारा करील, अशी शक्यता वर्तविली जाते.

सिरियाच्या लताकिया येथील लष्करी तळावर रशियाने आपली ‘एस-४००’ हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. ही हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियन लष्करी तळाला सुरक्षा पुरवित असून हे कवच भेदण्यासाठी ‘युएसएस ट्रुमन’ची अद्ययावत यंत्रणा महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. म्हणूनच ही युद्धनौका या ठिकाणी रवाना झाल्याचे दावे केले जातात. अमेरिकी नौदलाचे प्रतिनिधी लेफ्टनंट शोल मॉर्गन यांनी मात्र ‘युएसएस ट्रुमन’ची ही तैनाती म्हणजे सामान्य बाब असल्याचा दावा केला. पण ही युद्धनौका भूमध्य सागरात नक्की कधी दाखल होईल आणि किती काळ तैनात असेल, याची माहिती देण्याचे लेफ्टनंट मॉर्गन यांनी टाळले.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)

leave a reply