जेरूसलेम/तेहरान – नऊ दिवसांपूर्वी सिरियातील लष्करी तळावर हवाई हल्ला चढवून इस्रायलने इराणच्या आठ जवानांचा बळी घेतला होता. याचा सूड घेण्याची धमकी इराणकडून दिली जात असतानाच, इस्रायलने सिरियातील इराणच्या तळांवर नवे हल्ले चढविण्याचे संकेत दिले आहेत. इस्रायली लष्कराने सिरियातील इराणच्या तळांचे ‘सॅटेलाईट फोटोग्राफ्स’ प्रसिद्ध केले असून हे तळ लक्ष्य केले जातील, असा सूचक इशारा दिला. यावर इराणची प्रतिक्रिया उमटली असून ‘इस्रायलच्या सर्वनाशाची तारीख निश्चित झाली आहे’, अशी डरकाळी इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्याने फोडली आहे.
सिरियामध्ये इराणचे लष्करी तळ असल्याचा आरोप इस्रायलने याआधी केला होता. तशी तक्रारही इस्रायलने रशियाकडे केली होती. पण रशिया व इराणने इस्रायलचे हे आरोप फेटाळले होते. मंगळवारी इस्रायलच्या लष्कराने सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून सिरियातील पाच ठिकाणी इराणचे लष्करी-हवाईतळ असल्याचा आरोप नव्याने केला.
सिरियामध्ये अस्साद सरकारच्या बाजूने संघर्ष करणार्या इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्च्या नियंत्रणात सिरियाचे पाच तळ असून यामध्ये गेल्या आठवड्यात इस्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या होम्समधील ‘टी-4’ तळासह अलेप्पो, देर अल-झोर आणि राजधानी दमास्कसमधील लष्करी-हवाई तळांचा समावेश आहे. यापैकी ‘महारब्द’ या हवाईतळावर इराणची लढाऊ विमाने तैनात असल्याचेही या फोटोग्राफ्समध्ये दिसत आहे.
इस्रायलच्या लष्कराने सिरियातील इराणच्या हवाईतळांची ही माहिती उघड करुन थेट इराणला इशारा दिल्याचा दावा इस्रायलमधील लष्करी विश्लेषक ‘रॉनी डॅनियल’ यांनी केला आहे. इराणच्या सिरियातील हालचालींवर इस्रायलची करडी नजर असून इराणचे हे तळ यापुढे इस्रायलच्या निशाण्यावर असतील, असे संकेत इस्रायली लष्कर इराणला देत असल्याचे डॅनियल यांनी म्हटले आहे.
गेल्या सोमवारी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियातील इराणच्या हवाईतळावर चढविलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सिरियातील इराणच्या ठिकाणांवर पुन्हा हल्ले झाले तर इस्रायलचे ‘तेल अविव’ आणि ‘हैफा’ ही दोन शहरे जमीनदोस्त करून इस्रायल नष्ट करण्याच्या धमक्या इराणच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ल्याची तयारी केल्याची माहिती उघड झाली होती. यापुढे इराण हिजबुल्लाह किंवा इतर संघटनांच्या आधारे नाही तर स्वत:हून इस्रायलवर हल्ले चढवील, असा इशारा इस्रायलच्या अधिकार्यांनी दिला होता.
मंगळवारी इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्डस्’चे वरिष्ठ अधिकारी ‘ब्रिगेडिअर जनरल किउमर हैदरी’ यांनी देखील इस्रायलला धमकावले. इराणचे लष्कर आधीपेक्षा खूपच सामर्थ्यशाली बनले असून इस्रायलच्या विनाशाची तारीख निश्चित झाली आहे’, असे हैदरी यांनी इस्रायलला बजावले आहे.
इराण आवश्यक ती शस्त्रास्त्रे खरेदी करील – इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी
तेहरान, दि. 18 (वृत्तसंस्था) – ‘इराणमध्ये घुसखोरी करू पाहणार्या शत्रूंपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी इराण आवश्यक त्या शस्त्रास्त्रांची खरेदी करील. यासाठी इराणला कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही’, अशी घोषणा इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केली.
मात्र इराणला कुठल्याही देशावर हल्ला करायचा नाही. पण इराण स्वसंरक्षणासाठी आपल्या लष्कराच्या अत्याधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवील, असे रोहानी यांनी जाहीर केले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/986936460459855873 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/384729298602227 |