‘जिबौती’तील चीनच्या तळावरून अमेरिकी विमानांवर ‘लेझर’चा हल्ला – चीनने आरोप फेटाळले

‘जिबौती’तील चीनच्या तळावरून अमेरिकी विमानांवर ‘लेझर’चा हल्ला – चीनने आरोप फेटाळले

जिबौती/वॉशिंग्टन – आफ्रिकेतील ‘जिबौती’नजिक उडणार्‍या अमेरिकी विमानांवर चीनच्या संरक्षणतळावरून ‘लेझर’चे हल्ले झाल्याचा खळबळजनक आरोप अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला. गेल्या काही आठवड्यात सातत्याने ‘लेझर’चे हल्ले होत असून दोन वैमानिक त्यात जखमी झाल्याचेही संरक्षण विभागाने आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे. चीनने अमेरिकेचे हे आरोप फेटाळले असून ते तथ्यहीन असल्याचे प्रत्युत्तर दिले.

गुरुवारी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असणार्‍या ‘पेंटॅगॉन’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात चीनच्या ‘लेझर’ हल्ल्यांची माहिती देण्यात आली. ‘गेल्या काही आठवड्यात चीनच्या जिबौतीतील तळावरून अमेरिकी विमानांना लेझरने लक्ष्य करण्याच्या सुमारे १० घटना घडल्या आहेत. हे हल्ले चीनकडूनच झाल्याची अमेरिकेला खात्री आहे. या घटना अतिशय गंभीर असून आम्ही चीनकडे अधिकृतरित्या तक्रार नोंदविली आहे’, असे पेंटॅगॉनच्या प्रवक्त्या डॅना व्हाईट यांनी सांगितले.

अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘सी-१३०’ सह इतर लढाऊ तसेच टेहळणी विमानांवर ‘लेझर’चे हल्ले करण्यात आले असून तीन प्रसंगांमध्ये लष्करी स्तरावरील ‘लेझर’चा वापर करण्यात आला आहे. या हल्ल्यांमुळे दोन वैमानिकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचेही समोर आले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने आपल्या वैमानिकांना जिबौतीनजिक उड्डाण करताना विशेष काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

अमेरिकेने केलेले आरोप चीनने ‘तथ्यहीन’ असल्याचे म्हटले आहे. चीन कायम आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करते, अशी पुस्तीही चीनच्या संरक्षण मंत्रालयाने पुढे जोडली आहे.

अमेरिका युद्धनौकांवर ‘लेझर वेपन्स’ तैनात करणार

वॉशिंग्टन – अमेरिकेने आपल्या युद्धनौकांवर प्रगत ‘लेझर वेपन्स सिस्टिम’ तैनात करण्याचे संकेत दिले आहेत. नजिकच्या काळात अमेरिकेच्या युद्धनौकांवरील ‘गॅटलिंग गन्स’ व ‘मिसाईल लाँचर्स’ यांची जागा ‘हेलिऑस’ ही लेझर वेपन्स सिस्टिम घेईल. अमेरिकेने सध्या दोनपेक्षा अधिक युद्धनौकांवर ‘लेझर वेपन्स सिस्टिम’ तैनात केली असून त्याच्या प्रगत आवृत्तीच्या चाचण्या सुरू असल्याचेही समोर आले आहे. जिबौतीमध्ये अमेरिकेच्या विमानांवर चीनने लेझरचे हल्ले चढविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आलेली ही बातमी अमेरिका ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे दाखवून देत आहे.

‘ड्रोन्स, छोट्या बोटी व क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देण्यासाठी लेझर यंत्रणा तैनात करण्याबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. सध्या तैनात असलेल्या यंत्रणा बदलल्या जातील’, अशी माहिती संरक्षण विभागातील सूत्रांनी दिली. अमेरिकेचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या रशिया व चीन या देशांनी प्रगत हायपरसोनिक तसेच प्लाझ्मा वेपन्स विकसित केली आहेत. चीन व रशियाकडे अमेरिकेपेक्षा अधिक प्रगत शस्त्रास्त्र यंत्रणा असल्याचे इशारेही अमेरिकेच्या आजी व माजी अधिकार्‍यांनी दिले होते.

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/992849351604043776
https://www.facebook.com/WW3Info/