वॉशिंग्टन – सिरियात सुरू असलेल्या घडामोडी पाहता, अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली पाश्चिमात्य देश आणि रशियामध्ये अणुयुद्ध अटळ आहे. एकदा का हे अणुयुद्ध सुरू झाले तर त्यावर कुणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. हे युद्ध काही आठवडे आणि काही महिने चालणारे नसेल. तर हे युद्ध अगदी अल्पकाळ चालेल’, असा इशारा सोव्हिएत रशियाचे माजी लष्करी अधिकारी इव्हेग्नेय बुझेन्स्की यांनी दिला आहे.
सोव्हिएत रशियाच्या लष्करात लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झालेल्या व सध्या रशियन अभ्यासगट ‘पीआयआर’साठी काम करणार्या इव्हेग्नेय बुझेन्स्की यांनी याआधीही रशियाची भूमिका जहाल शब्दात मांडली होती. अमेरिकेतील निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपावरून अमेरिका आणि रशियाचे संबंध ताणले गेले होते.
तर रशियाचा माजी हेर सर्जेई स्क्रिपल याच्यावर लंडनमध्ये झालेल्या विषप्रयोगावरून ब्रिटन व अमेरिकेशी रशियाचे राजनैतिक पातळीवर युद्ध सुरू झाले होते. मात्र सिरियातील अमेरिका व पाश्चिमात्य देश आणि रशियाच्या हितसंबंधांचे थेट टक्कर होत आहे. याचा दाखला देऊन बुझेन्स्की यांनी ‘डेलि स्टार’ नावाच्या दैनिकाशी बोलताना अणुयुद्ध अटळ असल्याचा भयावह दावा केला.
सिरियातील संघर्षाचे पर्यावसन अणुयुद्धात होईल. अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली पाश्चिमात्य देश आणि रशिया यापैकी कुणीही एकाने अण्वस्त्रांचा वापर केला, तर त्यातून भयंकर अणुयुद्धाचा भडका उडेल. पण या अणुयुद्धाबाबत पाश्चिमात्य देशांचे आडाखे चुकू शकतात. हे युद्ध काही आठवडे किंवा काही महिने चालणार नाही. तर हे युद्ध अल्पकाळ चालणारे असेल, असे सांगून अण्वस्त्रांच्या वापरामुळे रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील या युद्धात भयंकर विनाश होईल, असे बुझेन्स्की यांनी बजावले आहे. एकदा का सिरियातील युद्धात रशियन्सचे रक्त सांडले तर आपण यातून माघार घेणार नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी याआधीच बजावले होते, याचीही आठवण बुझेन्स्की यांनी करून दिली. तसेच अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी रशियावर लष्करी दडपण वाढविले तर राष्ट्राध्यक्ष पुतिन अणुयुद्ध छेडण्यास कचरणार नाहीत, याचीही जाणीव इव्हेग्नेय बुझेन्स्की यांनी करून दिली आहे.
‘हे अणुयुद्ध आखातात, आशिया पॅसेफिक क्षेत्रात किंवा युरोपात कुठेतरी होईल, असे पाश्चिमात्य देशांना वाटत आहे. पण असा विचार करणे ही त्यांची दुसरी चूक ठरेल. कारण एकदा का हे अणुयुद्ध पेटले तर मग त्यावर कुणालाही नियंत्रण ठेवता येणार नाही’, असा इशारा बुझेन्स्की यांनी दिला. वेगळ्या शब्दात हे अणुयुद्ध सर्वनाश करूनच थांबेल, असे बुझेन्स्की यांना सुचवायचे आहे. याआधीही बुझेन्स्की यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भूमिका अधिक नेमक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करून अमेरिका व पाश्चिमात्य देशांसह जगालाही अणुयुद्धाचा गंभीर इशारा दिला होता.
सिरियातील इस्रायल व अमेरिकेच्या इराण तसेच रशियाविरोधी हालचाली तीव्र होत असताना, इव्हेग्नेय बुझेन्स्की यांनी आता अणुयुद्ध अटळ असल्याची दिलेली ही धमकी, जगाचा थरकाप उडविणारी असून नजिकच्या काळातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देत आहे.