तुर्कीच्या आर्थिक संकटाचा विख्यात गुंतवणूकदारांना फटका – रॉथचाईल्ड, जे. पी. मॉर्गन यासारख्या अग्रगण्य गुंतवणूकदारांचा समावेश

तुर्कीच्या आर्थिक संकटाचा विख्यात गुंतवणूकदारांना फटका – रॉथचाईल्ड, जे. पी. मॉर्गन यासारख्या अग्रगण्य गुंतवणूकदारांचा समावेश

लंडन – तुर्कीला धडा शिकविण्यासाठी अमेरिकेने या देशाच्या उत्पादनांवरील आयातकर वाढविला असला, तरी याचा फटका तुर्कीत मोठी गुंतवणूक करणार्‍या धनाढ्य गुंतवणूकदारांना बसल्याचे उघड झाले आहे. यामध्ये ‘बेरिंग्ज्’ ‘जे.पी. मॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंट’ आणि ‘एडमंड डी. रॉथचाईल्ड’ या कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे तुर्कीवरील सदर कारवाईवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इशारा देणार्‍यांमध्ये गुंतवणूकदारांचाही समावेश असल्याचे दिसते.

आर्थिक संकटतुर्कीत मोठ्या आर्थिक उलथापालथी सुरू असून ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंत तुर्कीश लिरा २८ टक्क्यांनी घसरला आहे. तुर्कीचा शेअर बाजार घसरणीच्या मार्गावर आहे. याचा मोठा फटका तुर्कीमध्ये गुंतवणूक करणार्‍या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना बसला आहे. यामध्ये अमेरिकेत केंद्र असलेल्या अग्रगण्य गुंतवणूकदारांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘बेरिंग्ज्’ ‘जे.पी. मॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंट’ आणि ‘एडमंड डी. रॉथचाईल्ड’ या कंपन्यांची तुर्कीतील गुंतवणूक धोक्यात आली असून यात घसरण नोंदविली जात आहे.

अमेरिकेतील माध्यमांनी तसेच काही अर्थतज्ज्ञांनी तुर्कीवरील निर्बंधांच्या विरोधात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इशारे देण्याची सुरूवात केली आहे. तुर्कीसह इतर देशांवरील निर्बंध इतर देशांची एकजूट वाढविणारे व अमेरिकेला एकाकी करणारे ठरतील, असे या माध्यमांचे तसेच अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी गुंतवणूकदारांच्या अर्धवार्षिक बैठकीत विख्यात गुंतवणूकदार जेकब रॉथचाईल्ड यांनी ट्रम्प यांच्या धोरणांना लक्ष्य केले.

‘दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात प्रस्थापित झालेली जागतिक वित्तीय व्यवस्था आजच्या घडीला धोक्यात आली आहे. जगभरात लोकप्रिय व बचावात्मक आर्थिक धोरणे स्वीकारणार्‍या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांना प्रतिसाद मिळतो आहे. आत्ताच्या आर्थिक अनिश्‍चिततेच्या वातावरणात ही बाब घातक ठरू शकते. अशा धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हानांचा एकजुटीने सामना करता येणे शक्य नाही’, असे जेकब रॉथचाईल्ड यांनी बजावले.

‘अमेरिकेवरील ९/११ हल्ला व २००८ सालच्या जागतिक मंदीच्या संकटाचा सामना प्रमुख देशांनी एकजुटीने केला. असे सहकार्य प्रस्थापित करणे आत्ताच्या काळात अवघड बनले आहे. यामुळे दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातील जागतिक वित्तीय व्यवस्था आणि सुरक्षा यांना धोका निर्माण झाला आहे’, असे रॉथचाईल्ड यांनी स्पष्ट केले. युरोपवरील कर्जाचे संकट आणि व्यापारयुद्ध या जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या बनल्या आहेत. उदयोन्मुख देशांच्या अर्थव्यवस्थांनाही यापासून मोठा धोका संभवतो, असे सांगून रॉथचाईल्ड यांनी याकडे लक्ष वेधले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info