तेहरान – इराणचा अणुकार्यक्रम आणि सिरियातील इराणच्या सैन्यतैनातीवरुन अमेरिका व इस्रायलबरोबरचा तणाव वाढत असताना इराणने थेट सिरियात क्षेपणास्त्र हल्ले चढविले. गेल्या महिन्यात इराणच्या ‘अहवाझ’ शहरातील लष्करी संचलनावर हल्ला चढविणार्या दहशतवाद्यांच्या सिरियातील मुख्यालयाला लक्ष्य केल्याची माहिती इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने दिली. इराणची क्षेपणास्त्रे सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळाजवळ कोसळल्याची माहिती समोर येत आहे.
सोमवारी इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या संकेतस्थळावर सिरियातील दहशतवाद्यांच्या मुख्यालयाला लक्ष्य केल्याचे प्रसिद्ध करण्यात आले. मध्यरात्री दोन वाजता इराणच्या ‘एअरोस्पेस डिव्हिजन’ने सिरियातून वाहणार्या युफ्रेटस नदीच्या पूर्वेकडील भागात सहा क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी ‘कियाम’ आणि ‘झोल्फाघर’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला.
इराणच्या वायव्येकडील ‘केरमानशाह’ या शहरातून ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यात आले. तर इराणच्या क्षेपणास्त्रांनी तब्बल ५७० किलोमीटर अंतर पार करून सिरियाच्या ‘देर अल-झोर’मधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले चढविले. या हल्ल्यात दहशतवाद्यांना मोठी जीवितहानी सोसावी लागल्याचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने म्हटले आहे.
यामध्ये इराणवरील हल्ल्याचा सूत्रधार व या संघटनेचे काही दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो. तसेच सदर माहिती रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून प्रसिद्ध होण्याआधी इराणच्या वृत्तवाहिन्यांवर क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या व्हिडिओ प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे आपले सिरियातील हल्ले यशस्वी झाल्याचे रिव्होल्युशनरी गार्ड्सनी प्रसिद्ध केले.
या क्षेपणास्त्र हल्ल्यांबरोबर सिरियाच्या या भागात ड्रोन हल्ले चढविल्याचा दावाही सदर संकेतस्थळावर करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे शस्त्रास्त्रांचे कोठार बेचिराख झाल्याची माहिती इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी दिली.
गेल्या महिन्यात इराणच्या दक्षिणेकडील ‘अहवाझ’ भागात रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या लष्करी संचलनावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २५ जणांचा बळी गेला तर ७० जण जखमी झाले होते. ठार झालेल्यांमध्ये ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या जवानांची संख्या मोठी होती. ‘आयएस’ तसेच इराणमधील ‘अल-अहवाझिया’ या दहशतवादी संघटनेने सदर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ‘आयएस’ने इराणवर पुन्हा हल्ले चढविण्याची धमकीही दिली होती. या पार्श्वभूमीवर इराणने हे हल्ले चढविल्याचे बोलले जाते.
दरम्यान, ‘अहवाझ’मधील हल्ल्यासाठी इराणने सिरियात क्षेपणास्त्र हल्ले चढविण्याच्या घटनेवर इस्रायली माध्यमांनी भुवया उंचाविल्या आहेत. ‘युफ्रेटस नदी’च्या पूर्वेकडील भागात अमेरिकी लष्कराचा तळ आहे. या तळापासून अवघ्या तीन मैल अंतरावर इराणची ही क्षेपणास्त्रे कोसळल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केली. याला अद्याप अमेरिकेने दुजोरा दिलेला नसला तरी पुढच्या काळात या हल्ल्यांना अमेरिकेचे उत्तर मिळाल्यावाचून राहणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.
इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |