चीनमुळे ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्ध भडकू शकते – मलेशियाच्या पंतप्रधानांचा इशारा

चीनमुळे ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्ध भडकू शकते – मलेशियाच्या पंतप्रधानांचा इशारा

लंडन – ‘‘‘साऊथ चायना सी’ व नजीकच्या सागरी क्षेत्रात कुठेही मुक्तपणे प्रवास करण्यासाठी चीन मोकळा आहे. पण हे करीत असताना चीनने या सागरी क्षेत्रात विनाशिका तैनात करू नये. असे केले तर या क्षेत्रातील तणाव वाढून संघर्ष भडकेल आणि त्याचे पर्यावसन युद्धात होईल’’, असा सज्जड इशारा मलेशियाचे पंतप्रधान ‘महाथिर मोहम्मद’ यांनी दिला. काही दिवसांपूर्वी महाथिर यांनी चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘सिल्क रूट’ला देखील कडाडून विरोध केला होता.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनंतर मलेशियाला परतण्याआधी पंतप्रधान महाथिर यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत महाथिर यांनी ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात निर्माण झालेल्या तणावावर चिंता व्यक्त केली. ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रावर चीन सार्वभौम अधिकार सांगू शकत नसल्याचे महाथिर यांनी यावेळी सांगितले.

‘‘कुठल्याही सागरी क्षेत्रातून मुक्तपणे प्रवास करण्याचा चीनला अधिकार आहे. पण त्याचवेळी चीनने इतर देशांच्या जहाजांना ‘साऊथ चायना सी’ आणि ‘मल्लाकाच्या आखाता’तून प्रवास करताना रोखू नये, अशी आमची अपेक्षा आहे’’, असे ताशेरे मलेशियन पंतप्रधानांनी ओढले. त्याचबरोबर या सागरी क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, अशी मलेशियाची अपेक्षा असल्याचे पंतप्रधान महाथिर म्हणाले.

यासाठी मलेशिया ‘साऊथ चायना सी’मधील युद्धनौका आणि विनाशिकांच्या तैनातीच्या विरोधात असल्याचे मलेशियन पंतप्रधान यांनी सांगितले. ‘चीनने या सागरी क्षेत्रात विनाशिका तैनात केल्या तर इतर देशही स्वत:च्या विनाशिका या क्षेत्रात दाखल करतील. असे झाले तर या सागरी क्षेत्रातील तणाव वाढून येथे संघर्ष भडकू शकतो. या संघर्षामुळे मोठे युद्ध पेट घेऊ शकते’, अशी चिंता महाथिर यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून चीनकडून या सागरी क्षेत्रातील वाढत असलेली सैन्यतैनाती तसेच अमेरिका व इतर देशांच्या युद्धनौकांना चीनकडून दिल्या जाणार्‍या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर मलेशियन पंतप्रधानांचा हा इशारा महत्त्वाचा ठरतो आहे.

‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रावर चीनप्रमाणे, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, ब्रुनेई आणि तैवान या देशांनीही हक्क सांगितला आहे. पण इतर देशांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करून चीन या सागरी क्षेत्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन नौदलाच्या ‘इंडो पॅसिफिक कमांड’च्या प्रमुखांनी साऊथ चायना सी क्षेत्रात चीनला रोखायचे असेल, तर युद्धच पुकारावे लागेल, असे बजावले होते. हा इशारा सदर सागरी क्षेत्रातील परिस्थिती स्फोटक बनल्याचे स्पष्ट करीत आहे. अशा स्थितीत काही दशकांचा राजकीय अनुभव गाठीशी असलेल्या मलेशियाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या या इशार्‍याचे गांभीर्य वाढले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info