काबुल – नाटो व अमेरिकी लष्कराने 2015 साली अफगाणिस्तानची जबाबदारी स्थानिक लष्कर व सुरक्षायंत्रणांवर सोपविल्यानंतर, सुमारे 30 हजार अफगाणी सैनिकांनी युद्धात प्राण गमावल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी दिली. गनी यांच्या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानात तालिबानविरोधात सुरू असलेला संघर्ष अधिकाधिक तीव्र होत चालल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. गेल्याच आठवड्यात ‘कॉस्ट ऑफ वॉर’ नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात, 17 वर्षे सुरू असलेल्या अफगाण युद्धात सुमारे दीड लाख जणांचा बळी गेल्याचा दावा करण्यात आला होता.
निवडणूक प्रचारात, आपण राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. मात्र राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर ट्रम्प यांना आपली भूमिका बदलावी लागली होती. राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर वेगळेच दृश्य दिसते, असे सांगून अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धाची अपरिहार्यता ट्रम्प यांनी मान्य केली होती. त्यानंतर अमेरिकी लष्कराने तालिबानविरोधी युद्धातील आपल्या कारवायांची व्याप्ती अधिकच वाढविली होती. मात्र असे असले तरी याच कालावधीत तालिबानने अफगाणी लष्कर व सुरक्षायंत्रणांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढविल्याचेही उघड झाले आहे.
2015 साली अफगाणी लष्कर व सुरक्षायंत्रणांचा भाग असलेल्या पाच हजार जवानांना प्राण गमवावे लागले होते. मात्र त्यानंतर 2016, 2017 व या वर्षात ही आकडेवारी सातत्याने वाढत गेल्याचे समोर येत आहे. अमेरिकेच्या ‘सिगार’ या यंत्रणेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातही यावर्षी उन्हाळ्यात अफगाणी सैनिकांचा बळी जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक असल्याकडे लक्ष वेधले होते. अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनीही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत तब्बल एक हजारांहून अधिक अफगाणी जवान मारले गेल्याची माहिती दिली होती.
या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष गनी यांनी तालिबानविरोधी युद्धात अफगाणी सुरक्षादलांच्या होणार्या हानीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. गनी यांच्या वक्तव्यातून समोर आलेली अफगाणी सैनिकांची संख्या इतर अहवालांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसते. ही आकडेवारी अफगाणी सुरक्षायंत्रणा तालिबानचा पूर्ण क्षमतेने मुकाबला करण्यास सक्षम नसल्याची बाब अधोरेखित करणार्या आहेत. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत फराह, गझनी, तखार यासारख्या प्रांतांमध्ये तालिबानकडून सातत्याने होणारे हल्लेही याच गोष्टीला दुजोरा देणारे आहेत.
त्यामुळे नजिकच्या काळात अमेरिका व नाटोला अफगाणिस्तानमधील आपली तैनाती अधिक वाढवावी लागेल, असे संकेत मिळत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |