अफगाणिस्तानातील युद्धाचे पारडे फिरले; अमेरिका व अफगाणिस्तानच्या हवाई हल्ल्यात १२० तालिबानी ठार

अफगाणिस्तानातील युद्धाचे पारडे फिरले; अमेरिका व अफगाणिस्तानच्या हवाई हल्ल्यात १२० तालिबानी ठार

काबुल/मॉस्को, दि. १५ (वृत्तसंस्था) – अमेरिका आणि अफगाणिस्तानने संयुक्तपणे चढविलेल्या हवाई हल्ल्यात १२० तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. यात तालिबानचा कमांडर मौलवी नुरुद्दीन याचाही समावेश आहे. मात्र तालिबानने नूरुद्दिन ठार झालेला नसल्याचे म्हटले आहे. मात्र अमेरिकेने चर्चा रद्द करून तालिबानवर सुरू केलेल्या घणाघाती कारवाईचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. तालिबानचे शिष्टमंडळ चर्चेसाठी रशियात दाखल झाले आहे. तसेच अमेरिकेबरोबरील चर्चा नव्याने सुरू करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे संकेत तालिबान देत आहे. यासाठीच तालिबानने रविवारी ‘रेड क्रॉस’वर टाकलेली बंदी मागे घेण्याची घोषणा केली.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये हल्ले घडवून तालिबानने मोठी चूक केली व त्याचे भयंकर परिणाम तालिबानला भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आणखी एकवार दिला. चर्चा रद्द करून अमेरिकेने आपलेच नुकसान केल्याचे दावे ठोकणार्‍या तालिबानलाही आता वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. आत्तापर्यंत झाली नव्हती, इतकी कठोर कारवाई तालिबानवर केली जात असल्याची माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या सरकारची तालिबानबाबतची भाषाही आक्रमक बनली आहे. अफगाणिस्तानच्या उत्तर आणि पश्‍चिमेकडील भागात तालिबानी दहशतवाद्यांवर अमेरिका तसेच अफगाणिस्तानने संयुक्त हवाई हल्ले चढवून १२० दहशतवाद्यांना ठार केले आहे.

या दहशतवाद्यांमध्ये तालिबानने समानगान प्रांताचा गर्व्हनर घोषित केलेल्या मौलवी नुरुद्दीन याचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. तालिबानने मात्र नुरुद्दीनबाबत दिलेली माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. तरीही गेल्या काही दिवसात अफगाणिस्तान व अमेरिकेच्या सैन्याने सुरू केलेल्या आक्रमक कारवाईत तालिबानचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून याचे तालिबानवर फार मोठे दडपण आल्याची चिन्हेही समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, रविवारी तालिबानने रेड क्रॉस या संस्थेवर टाकलेली बंदी मागे घेतली. याद्वारे तालिबान अमेरिकेसहीत जगाला आपण मानवतावादी कार्याच्या विरोधात नाही, असा संदेश देऊ पाहत आहे.

तालिबानचे शिष्टमंडळ रशियात दाखल झाले असून रशियाचे अफगाणिस्तानविषयक दूत काबुलोव्ह यांनी तालिबानच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी अमेरिका व तालिबानमधील चर्चा पुन्हा सुरू व्हावी, अशी रशियाची भूमिका असल्याचे काबुलोव्ह यांनी म्हटले आहे. तालिबानने देखील अमेरिकेबरोबर चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत दिले.

अफगाणी सरकारबरोबर तालिबानला चर्चा हवी असेल तर तालिबानने नव्या अफगाणिस्तानने आखलेल्या मर्यादांचा आदर करावा, असे अफगाणिस्तानच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी बजावले आहे. आमच्यासाठी ‘पिपल्स रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’ हे देशाचे नाव, महिलांचे नागरी वराजकीय अधिकार आणि राजकीय प्रक्रियेत जनतेचा सहभाग, या अत्यंत महत्वाच्या गोष्टी ठरतात. यांचा आदर केल्याखेरीज आता अफगाणिस्तानचे सरकार देखील तालिबानशी चर्चा करणार नाही, असे या अफगाणी राजनैतिक अधिकार्‍यांनी बजावले आहे.

याआधी तालिबानने अफगाणिस्तानच्या सरकारशी चर्चा करणार नाही, असे ठणकावून अमेरिकेशीच चर्चा होईल, अशी ताठर भूमिका घेतली होती. पण अमेरिकेने तालिबानबरोबरची चर्चा रद्द केल्यानंतर अफगाणिस्तानातील पारडे फिरले आहे. अफगाणी सरकारची बदललेली भाषा याचे स्पष्ट संकेत देत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info