वॉशिंग्टन – अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा विजय नोंदविता आला नाही. या निवडणुकीत सिनेट रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात राहिली असली तरी ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ अर्थात प्रतिनिधीगृह डेमोक्रॅट पक्षाच्या प्रभावाखाली आले आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे हात बांधले जातील व त्यांना मनमानी करता येणार नाही, असा दावा अमेरिकन माध्यमे करीत होती. पण प्रत्यक्षात उलटे घडले असून मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांनी स्वपक्षीय विरोधकांचा काटा काढला व डेमोक्रॅट पक्षातील आपल्या समर्थकांना प्रतिनिधीगृहात आणले. यामुळे ट्रम्प यांची अमेरिकेच्या संसदेवरील पकड अधिकच भक्कम झाली आहे.
डेमोक्रॅट पक्षाच्या वरिष्ठ नेत्या ‘नॅन्सी पेलोसी’ मध्यावधी निवडणुकीत विजयी झाल्या असून प्रतिनिधीगृहात त्या ट्रम्प यांना रोखतील, असे दावे केले जात होते. पण आता ट्रम्प यांनी नॅन्सी पेलोसी यांना प्रतिनिधीगृहाच्या सभापती बनविण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांना लागतील तितकी मते मिळवून देण्याची घोषणा करून ट्रम्प यांनी सर्वांना चकीत केले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना ट्रम्प करीत असलेले हे सहाय्य चक्रावून टाकणारे ठरते. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पेलोसी यांच्या ज्येष्ठतेचा दाखला देऊन आपल्या या निर्णयाचे समर्थन केले.
‘नॅन्सी पेलोसी यांना अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती म्हणून निवडून आणण्यासाठी आवश्यक असलेली मते मी त्यांना मिळवून देईन. सभापतीपदाच्या निवडणुकीतील विजय हा त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांनी परिश्रमाने मिळविला आहे. डेमोक्रॅट पक्षातील काही जण त्यांच्यापासून हा विजय हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याच जिंकतील, याची मला खात्री आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांना उघड समर्थन दिले आहे. कडवे रिपब्लिकन म्हणून ओळखण्यात येणार्या ट्रम्प यांनी केलेली ही घोषणा राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारी ठरली.
मध्यावधी निवडणुकीत प्रतिनिधीगृहाच्या 435 जागांपैकी 430 जागांचे निकाल लागले असून त्यातील 232 जागा ‘डेमोक्रॅट’ तर 198 जागा ‘रिपब्लिकन’ पक्षाला मिळालेल्या आहेत. बहुमतासाठी तसेच प्रतिनिधीगृहाचा सभापती निवडून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या 218 जागा ‘डेमोक्रॅट’कडे आहेत. त्यामुळे ‘डेमोक्रॅट’ उमेदवार सहजगत्या सभापती म्हणून निवडून येऊ शकतात. यापूर्वी 2007 ते 2011 या कालावधीत सभापतीपद भूषविलेल्या नॅन्सी पेलोसी ‘डेमोक्रॅट’ पक्षाच्या उमेदवार असतील, असे मानले जाते.
मात्र पक्षातील जवळपास 17 सदस्यांनी याला विरोध केला असून यावेळी सभापती म्हणून नवा चेहरा हवा, अशी मागणी केली आहे. पण या विरोधकांकडे चेहरा नसल्याने पेलोसी याच ‘डेमोक्रॅट’ पक्षाकडून सभापती म्हणून उभ्या राहतील व निवडून येतील, असे मानले जाते. मात्र विरोध करणार्या सदस्यांनी विरोधात मतदान करायचे ठरविल्यास पेलोसी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुढे केलेला सहाय्याचा प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो.
मुख्य म्हणजे प्रतिनिधीगृहात नॅन्सी पेलोसी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना रोखतील, असा दावा करणारे विश्लेषक अचंबित झाले आहेत. त्याचवेळी मध्यवधी निवडणुकीत ‘आपलाच विजय झाला’ या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेचा वास्तविक अर्थ आत्ता उघड झाल्याचे दिसत आहे.
नॅन्सी पेलोसी यांच्यासह मध्यावधी निवडणुकीत विजयी ठरलेले उमेदवार ट्रम्प यांचे छुपे समर्थक असल्याचा दावा काही विश्लेषकांनी केला होता. आपल्याच रिपब्लिकन पक्षातील विरोधकांना पराभूत करून ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षातील आपल्या समर्थकांना निवडून आणले, असे या विश्लेषकांचे म्हणणे होते.
नॅन्सी पेलोसी यांनी देखील आपल्या विजयानंतर रचनात्मक काम करणार असल्याचे विधान करून केवळ ट्रम्प यांना विरोधासाठी विरोध करणार नसल्याचे जाहीर केले होते. यामागे असलेला राजकीय अर्थही आता स्पष्ट झाला आहे.
म्हणूनच मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प पूर्वीपेक्षाही अधिक सामर्थ्यशाली बनल्याचे दिसू लागले असून ते कमकुवत बनल्याचा दावा करणारे सारे विरोधक तोंडघशी पडल्याचे स्पष्ट होत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |