२०२४ साल ‘जॉर्ज ऑर्वेल’ यांच्या ‘१९८४’ प्रमाणे नसेल याची काळजी घ्यायला हवी – मायक्रोसॉफ्टचे प्रेसिडंट ‘ब्रॅड स्मिथ’ यांचा इशारा

२०२४ साल ‘जॉर्ज ऑर्वेल’ यांच्या ‘१९८४’ प्रमाणे नसेल याची काळजी घ्यायला हवी – मायक्रोसॉफ्टचे प्रेसिडंट ‘ब्रॅड स्मिथ’ यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘फेशिअल रेकग्निशन’ तंत्रज्ञान मानवी समाजातील मूलभूत स्वातंत्र्यांवर गदा आणणारे ठरु शकते. या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचंड व्याप्ती असणारी सामूहिक टेहळणी सुरू होऊ शकते. हे घडणारच नाही, असे कोणीच सांगू शकत नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन २०२४ साल हे जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ कादंबरीतील पान ठरणार नाही, याची काळजी घ्यायला हवी’, अशा शब्दात मायक्रोसॉफ्टचे प्रेसिडंट ब्रॅड स्मिथ यांनी ‘फेशिअल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.

मायक्रोसॉफ्टचे प्रेसिडंट, धोक्याचा इशारा, ब्रॅड स्मिथ, जॉर्ज ऑर्वेल, Facial Recognition, technology, टेहळणी, वॉशिंग्टन, ww3प्रसिद्ध ब्रिटीश साहित्यिक जॉर्ज ऑर्वेल यांची ‘१९८४’ ही कादंबरी १९४९ साली प्रकाशित झाली होती. या कादंबरीत १९८४ साली घडणारे एक कथानक मांडण्यात आले होते. जगातील बहुसंख्य जनतेला सतत युद्धाला सामोरे जावे लागत असून एकतंत्री हकुमशाही राजवटीने खोट्या माहितीचा प्रचार व सामूहिक टेहळणीच्या माध्यमातून जनतेवर नियंत्रण ठेवले आहे, असे कादंबरीचे कथासूत्र होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘क्लासिक’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘१९८४’ या कादंबरीतील ‘बिग ब्रदर’, ‘२+२=५’ यासारख्या संकल्पना जगभरात प्रसिद्ध आहेत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखण्यात येणार्‍या मायक्रोसॉफ्टच्या प्रेसिडंटकडून या कादंबरीचा हवाला दिला जाणे लक्ष वेधून घेणारे ठरते. प्रेसिडंट ब्रॅड स्मिथ यांनी गेल्या आठवड्यात कंपनीच्या ब्लॉगवर लिहिलेल्या एका लेखात ‘फेशिअल रेकग्निशन’ या तंत्रज्ञानाच्या वाढत्या धोक्यांचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख करताना त्यांनी दोनदा जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘१९८४’ कादंबरीचा संदर्भ दिला आहे.

‘‘देशाचा प्रत्येक भाग व्यापणारे कॅमेरे, कॉम्प्युटर्सची प्रचंड प्रमाणातील क्षमता आणि क्लाऊड स्टोरेजचा वापर या जोरावर, सत्ताधारी राजवट ‘फेशिअल रेकग्निशन’चा वापर काही नागरिकांवर कायमस्वरुपी टेहळणी करण्यासाठी करू शकते. हा वापर कोणाचाही कुठेही किंवा सर्वांचा सर्व ठिकाणी सतत पाठलाग करु शकतो. हे कधीही, कोणत्याही वेळेला किंवा कायम घडू शकते. ‘फेशिअल रेकग्निशन’ तंत्रज्ञानातून अभूतपूर्व अशी व्याप्ती असणारी सामूहिक टेहळणी सुरु होऊ शकते’’, अशा शब्दात ब्रॅड स्मिथ यांनी सरकारकडून चुकीच्या कारणांसाठी तंत्रज्ञान वापरले जाण्याचा धोका उघड केला.

मायक्रोसॉफ्टचे प्रेसिडंट, धोक्याचा इशारा, ब्रॅड स्मिथ, जॉर्ज ऑर्वेल, Facial Recognition, technology, टेहळणी, वॉशिंग्टन, ww3हा धोका उघड करून त्यांनी जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘१९८४’चा उल्लेख केला. सरकारी टेहळणी टाळण्यासाठी नागरिकांना एका अंधार्‍या खोलीत एकमेकांच्या हाताच्या सहाय्याने देण्यात येणार्‍या संदेशांचे माध्यम वापरावे लागते, असे वर्णन ‘१९८४’मध्ये करण्यात आले आहे. ऑर्वेल यांनी तब्बल ७० वर्षांपूर्वी ही भीती व्यक्त केली होती. आज तंत्रज्ञानामुळे ऑर्वेल यांची ही भीती प्रत्यक्षात उतरू शकते, असे मायक्रोसॉफ्टच्या प्रेसिडंटनी बजावले.

हे टाळायचे असेल तर तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी एकत्र येऊन सरकारला ‘फेशिअल रेकग्निशन’च्या वापराबाबत कायदे बनविण्यासाठी दडपण आणायला हवे, असे आवाहनही स्मिथ यांनी केले.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info