रिओ दि जानिरो – लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएला, क्युबा व निकरागुआसारख्या देशांमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यावर अमेरिका व ब्राझिलमध्ये एकमत झाले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ब्राझिलचे नवे राष्ट्राध्यक्ष ‘झैर बोल्सोनारो’ व परराष्ट्रमंत्री ‘अर्नेस्टो अराऊजो’ यांच्याबरोबर केलेल्या चर्चेत यावर चर्चा झाल्याची माहिती अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो, लॅटिन अमेरिकेत ‘ट्रॉपिकल ट्रम्प’ या उपाधीने प्रसिद्ध असून त्यांची भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी साधर्म्य असणारी आहे, असे मानले जाते.
ब्राझिलचे नवे राष्ट्राध्यक्ष ‘झैर बोल्सोनारो’ यांचा मंगळवारी शपथविधी पार पडला. त्यासाठी अमेरिका, इस्रायलसह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यापूर्वी जवळपास एक दशकाहून अधिक काळ ब्राझिलमध्ये सत्तेवर असणार्या डाव्या विचारसरणीच्या राजवटीशी अमेरिकेचे संबंध कायम तणावपूर्ण राहिले होते. मात्र बोल्सोनारो यांची निवड अमेरिकेसाठी महत्त्वाची ठरली आहे. अंतर्गत सुरक्षा, अर्थ, परराष्ट्र, संरक्षण, हवामानबदल यासारख्या अनेक मुद्यांवर ब्राझिलचे नवे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका एकसमान असल्याचे दिसते. यामुळेच त्यांना ‘ट्रॉपिकल ट्रम्प’ म्हटले जाते.
परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी घेतलेली भेट व त्यात झालेल्या चर्चेतूनही हीच बाब अधोरेखित झाल्याचे दिसते. लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये सत्ताबदल झाले असले तरी या देशांमधील सर्व राजवटी अमेरिकेच्या समर्थक नाहीत. मात्र ब्राझिल, कोलंबिया व अर्जेंटिना यासारख्या लॅटिन अमेरिकेतील आघाडीच्या देशांमध्ये सध्या अमेरिकेच्या भूमिकेचे समर्थन करणारी तसेच जवळिक साधणार्या राजवटी तसेच नेते सत्तेवर आहेत. या राजवटींच्या सहाय्याने लॅटिन अमेरिकेतील आपला प्रभाव पुन्हा वाढविण्यासाठी अमेरिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
लॅटिन अमेरिकेतील क्युबा, व्हेनेझुएला व निकरागुआ हे देश अमेरिकेचे कट्टर विरोध म्हणून ओळखण्यात येतात. या देशांमध्ये डाव्या विचारसरणीचे कट्टर समर्थन करणार्या राजवटी सत्तेवर आहेत. या राजवटींनी अमेरिकेला सातत्याने आव्हान दिले असून त्यात बदल घडविण्यासाठी अमेरिका उत्सुक आहे. अमेरिकेला आव्हान देणार्या या राजवटींनी रशिया व चीनचे मोठ्या प्रमाणात सहकार्य घेण्यास सुरुवात केली असून ही बाब, अमेरिकेला अस्वस्थ करणारी ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर, ब्राझिलच्या नव्या राजवटीने लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये अमेरिकेच्या सहकार्याने लोकशाही राजवटींची स्थापना करण्यासाठी समर्थन देण्याचा घेतलेला निर्णय लक्ष वेधून घेणारा ठरतो. या निर्णयामुळे येत्या वर्षभरात लॅटिन अमेरिकेतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून या भागातील राजकीय समीकरणे बदलली जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |