जेरूसलेम, दि. २५ (वृत्तसंस्था) – इस्रायलच्या ‘तेल अविव’मधील ‘बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर हल्ले चढविण्याचा सिरियाने दिलेला इशारा इस्रायलने गांभीर्याने घेतला आहे. इस्रायलच्या लष्कराने बेन गुरियन विमानतळ तसेच तेल अविवमधील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी ‘आयर्न डोम’ हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. तेल अविवप्रमाणे इस्रायलने दक्षिण सीमाभागातही ही यंत्रणा कार्यान्वित केली असून सिरिया तसेच गाझापट्टीतून एकाचवेळी हल्ले चढविले जातील, अशी शक्यता इस्रायली सुरक्षा यंत्रणा वर्तवित आहेत.
इस्रायलची आर्थिक राजधानी म्हणून ओळखण्यात येणार्या तेल अविव शहरात ‘आयर्न डोम’ तैनात केल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. ‘आयर्न डोम’ यंत्रणेची बॅटरी पूर्णपणे सज्ज असून इस्रायली सैनिकांची विशेष तुकडीही या ठिकाणी तैनात केली आहे. या व्यतिरिक्त दक्षिण इस्रायलमध्ये गाझापट्टीच्या सीमेजवळही ‘आयर्न डोम’ कार्यान्वित केल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. याआधी इस्रायलने गोलान टेकड्यांच्या सीमेजवळ तसेच गाझापट्टीजवळच्या सीमेवर ही यंत्रणा तैनात केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून सिरिया तसेच गाझातील हमासकडून इस्रायलच्या सुरक्षेला असलेला धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयर्न डोम’ची ही तैनाती केल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले.
दोन दिवसांपूर्वी सिरियाने तेल अविवमधील बेन गुरियन विमानतळावर हल्ले चढविण्याचा इशारा दिला होता. गेल्या आठवड्यात इस्रायलने सिरियातील इराणच्या ‘कुद्स फोर्सेस’च्या लष्करी तळांवर तुफानी हल्ले चढविले होते. इराणच्या शस्त्रास्त्रांच्या गोदामावरील इस्रायलच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी सिरियाने कार्यान्वित केलेली हवाई सुरक्षा यंत्रणाही इस्रायलने भेदली होती. इस्रायलने सिरियावर चढविलेल्या या हल्ल्यांचा निषेध करून संयुक्त राष्ट्रसंघातील सिरियाच्या राजदूतांनी इस्रायलची आर्थिक राजधानी लक्ष्य करण्याची धमकी दिली होती.
सिरियापाठोपाठ गाझापट्टीतील हमासनेही इस्रायलवर हल्ले चढविण्याचा इशारा दिला. गेल्या महिन्यात इस्रायलच्या कमांडोज्नी गाझापट्टीत घुसून केलेली कारवाई तसेच दोन दिवसांपूर्वी गाझातील हमासच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी हमासने केली होती. हमासच्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलने ‘आयर्न डोम’च्या हालचाली वाढविल्या आहेत.
इस्रायलकडून सिरियात केल्या जाणार्या हल्ल्यांच्या विरोधात रशियाने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. इस्रायलने सिरियात हल्ले करणे थांबवावे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्रायलला बजावले आहे. रशियाने इस्रायलला फटकारल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या सिरियाने इस्रायलला चिथावणी देण्यास सुरुवात केल्याचा दावा इस्रायलची माध्यमे करीत आहेत. गुरुवारी उशीरा सिरियाच्या सीमाभागातून इस्रायली सैनिकांवर गोळीबार झाला. सिरियातून झालेल्या या गोळीबाराला इस्रायली लष्कराने प्रत्युत्तर दिले. हा गोळीबार कुणी केला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण गोळीबाराची घटना व ‘आयर्न डोम’च्या तैनातीनंतर इस्रायल आणि सिरियाच्या सीमेवरील तसेच गोलान टेकड्यांच्या हद्दीतील तणाव वाढला आहे.
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |