काबुल/इस्लामाबाद – गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनवाला आणि बलुचिस्तान प्रांतात सुरू असलेल्या निदर्शनांवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईवर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने निदर्शकांवरील कारवाई रोखली नाही, तर पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अफगाणी राष्ट्राध्यक्ष ‘अश्रफ गनी’ यांनी दिला. अफगाणी राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या इशार्यावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त करत अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या कारभारात लुडबूड करू नये, असे सुनावले आहे.
पाकिस्तानच्या वायव्येकडील ‘खैबर-पख्तूनवाला’ प्रांतातील ‘पश्तून तहफ्फूज मुव्हमेंट’ (पीटीएम) या संघटनेची पाकिस्तानी लष्कराविरोधात निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तानी लष्कर पश्तून जनतेविरोधात कारवाई करीत असल्याचा आरोप ‘पीटीएम’ करीत आहे. वर्षभरापूर्वी कराची येथे पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेने दहशतवादविरोधी कारवाईच्या नावाखाली पश्तून नागरिकाला ठार केले होते. तसेच अफगाणिस्तान सीमेजवळच्या वझिरिस्तान आणि आसपासच्या भागात दहशतवादविरोधी कारवाईअंतर्गत पाकिस्तानी लष्कर पश्तून नागरिकांचे शिरकाण करीत असल्याचा ठपका ‘पीटीएम’ने ठेवला आहे.
गेल्या महिन्यात पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईविरोधात असंतोषाचा भडका उडाला. पाकिस्तानी यंत्रणेच्या या कारवाईवर संतापलेल्या ‘पीटीएम’ने गेल्या काही आठवड्यांपासून खैबर-पख्तूनवाला भागातील निदर्शने तीव्र केली आहेत. वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या ‘पीटीएम’ या संघटनेच्या या निदर्शनांना पश्तून जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी खैबर-पख्तूनवालातून चालते व्हावे, अशी मागणी या निदर्शकांकडून केली जात आहे. खैबर-पख्तूनवाला वगळता पाकिस्तानच्या कराची, पेशावर व इतर प्रमुख शहरांमध्ये ‘पीटीएम’ने आयोजित केलेल्या निदर्शनांनाही पश्तून जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. ही उग्र निदर्शने म्हणजे ‘दुसर्या बांगलादेश’ची तयारी असल्याची भीती पाकिस्तानी विश्लेषक व माध्यमे व्यक्त करू लागले आहेत.
त्यातच बलुचिस्तानमधील पाकिस्तानी लष्कराच्या विरोधातील निदर्शने देखील तीव्र झाली आहेत. पाकिस्तानी लष्कर कुठल्याही आरोपाशिवाय बलुच तरुणांना अटक करीत असून याला विरोध करणार्यांची हत्या करीत असल्याचा आरोप बलुचिस्तानमध्ये होत आहे. एकाचवेळी खैबर-पख्तुनवाला आणि बलुचिस्तानमध्ये पेटलेल्या या निदर्शनांमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानी लष्कराने दोन दिवसांपूर्वी पश्तून व बलुचींवर कठोर कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानी लष्कराने १९ पश्तून निदर्शकांना ताब्यात घेतले.
पाकिस्तानी लष्कराने पश्तून व बलुची निदर्शकांवर केलेल्या या कारवाईवर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी आक्षेप घेतला. ‘खैबर-पख्तुनवाला आणि बलुचिस्तानमध्ये आपल्या नागरी अधिकारांची सनदशीर मार्गाने मागणी करणार्या निदर्शकांवर पाकिस्तानी लष्कराने केलेली कारवाई निंदनीय ठरते. या क्षेत्राच्या सुरक्षेला तसेच दहशवाद व कट्टरवादाविरोधात भूमिका घेणार्या सर्वच देशांनी पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईचा विरोध करायला हवा. ही आपली नैतिक जबाबदारी ठरते’, असे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी म्हटले आहे. ‘पाकिस्तानी लष्कराने ही कारवाई थांबविली नाही तर येत्या काळात त्याचे भीषण परिणाम होतील’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष गनी यांनी दिला.
वांशिक व भौगोलिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या पाकिस्तानातील पश्तू व बलुच जनता अफगाणिस्तानशी जोडलेली आहे. म्हणूनच इथल्या जनतेवर पाकिस्तानकडून केल्या जाणार्या कारवाईवर अफगाणिस्तानकडून ही प्रतिक्रिया आल्याचे दिसते. अफगाणी राष्ट्राध्यक्षांच्या या भूमिकेचे ‘पीटीएम’ने स्वागत केले. तर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका केली आहे. राष्ट्राध्यक्ष गनी यांनी आपल्या देशाच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करावे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या अस्थैर्याला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जबाबदार असल्याचा ठपका अफगाणिस्तान सरकार व सुरक्षा यंत्रणा सातत्याने करीत आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये सीमावाद असून या सीम वर दोन्ही देशांच्या लष्कराची चकमक झडत असल्याचीही बरीच उदाहरणे आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधला वाद वाढत चालला असून आता या वादात अफगाणिस्तानत अधिकाधिक आक्रमक भूमिका स्वीकारू लागल्याचे समोर येत आहे. पश्तू व बलुच जनतेवरील पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईवरून अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला दिलेल्या इशार्याने हे नव्याने अधोरेखित होत आहे.
We believe it is the moral responsibility of every government to support civil activities that take a stand against the terrorism and extremism that plagues and threatens our region and collective security. Otherwise there could be long-standing negative consequences.
— Ashraf Ghani (@ashrafghani) February 7, 2019
The Afghan government has serious concerns about the violence perpetrated against peaceful protestors and civil activists in Khyber Pakhtunkhwa and Balochistan.
— Ashraf Ghani (@ashrafghani) February 7, 2019
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |