वॉशिंग्टन/बुडापेस्ट – मध्य युरोपिय देशांना रशियाचा इंधनपुरवठा, चिनी गुंतवणुकीचा ओघ व इराणला मिळणारे वाढते समर्थन यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ सोमवारी युरोपच्या दौर्यावर दाखल झाले. परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ हंगेरी, स्लोवाकिया, पोलंड, बेल्जियम व आईसलॅण्ड या युरोपिय देशांना भेट देणार आहेत. या दौर्यात पोलंडमध्ये होणारी ‘फ्युचर ऑफ पीस अॅण्ड सिक्युरिटी इन मिडल ईस्ट’ ही परिषद महत्त्वाची ठरणार असून त्याला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूदेखील उपस्थित राहणार आहेत.
युरोपला इंधनपुरवठा करणार्या देशांमध्ये रशिया आघाडीवर असून या माध्यमातून रशिया युरोपिय देशांना वेठीस धरेल, असा आरोप अमेरिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. रशियाचे युरोपातील इंधनप्रकल्प व गुंतवणूक रोखण्यासाठी अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली असून अधिकाधिक देशांनी रशियाची साथ सोडावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी अमेरिकी इंधनपुरवठ्याबरोबरच इतर आर्थिक सवलती व करार करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांच्या या युरोप दौर्यातही यावर भर देण्यात येईल, असे संकेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिले.
युरोप दौर्यासाठी हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये दाखल झालेले पॉम्पिओ पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा करतील. त्यात रशिया पुरस्कृत इंधनप्रकल्पाला देण्यात येणारे सहाय्य थांबवावे आणि नाटोकडून रशियन आक्रमकतेचा मुकाबला करण्यासाठी आखलेल्या मोहिमांना अधिक मदत करावी, या गोष्टींचा समावेश आहे. हंगेरीबरोबर द्विपक्षीय संरक्षण सहकार्य करार करण्याचे संकेतही देण्यात आले. त्यात ‘एअर अॅण्ड मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ सामील असण्याची माहिती सूत्रांनी दिली. हंगेरीचे पंतप्रधान ऑर्बन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक म्हणून ओळखण्यात येत असल्याने त्याची दखल घेऊन हंगेरीबरोबरील सहकार्य भक्कम करण्यावर भर देण्यात येईल, असे परराष्ट्र विभागाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.
हंगेरीसह स्लोवाकिया तसेच पोलंडमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे. हंगेरी व पोलंडमध्ये चीनच्या वादग्रस्त ‘हुवेई’ कंपनीच्या गुंतवणुकीचा समावेश असून त्याविरोधात अमेरिकी परराष्ट्रमंत्री आपली भूमिका मांडतील, असे मानले जाते. स्लोवाकियाने अमेरिकेबरोबर संरक्षण सहकार्य करण्याचे संकेत दिले असून ‘एफ-१६’ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत पॉम्पिओ यांच्या भेटीत अंतिम बोलणी होतील, असे सांगण्यात येते.
पोलंडमध्ये होणारी ‘फ्युचर ऑफ पीस अॅण्ड सिक्युरिटी इन मिडल ईस्ट’ ही परिषद अमेरिकेकडून इराणविरोधात सुरू असणार्या प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गेल्या वर्षभरात युरोपिय देशांकडून इराणला अनेक प्रकारे सहकार्य करण्यात येत असून या सहकार्याला अमेरिकेने जोरदार विरोध दर्शविला आहे. मात्र काही युरोपिय देशांनी अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता इराणला सहाय्य करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून युरोपमध्येच इराण मुद्यावर विशेष परिषदेचे आयोजन, ही लक्ष वेधून घेणारी बाब ठरते. या परिषदेत इस्रायलच्या पंतप्रधानांसह अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्सही सहभागी होणार आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |