अफगाणिस्तानचा विरोध व सौदी क्राऊन प्रिन्सच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व अफगाण तालिबानची पाकिस्तानमधील चर्चा रद्द

अफगाणिस्तानचा विरोध व सौदी क्राऊन प्रिन्सच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व अफगाण तालिबानची पाकिस्तानमधील चर्चा रद्द

इस्लामाबाद – पाकिस्तानकडून तालिबानला मिळणार्‍या समर्थनाचा मुद्दा उपस्थित करून अफगाणिस्तान सरकारने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सोमवारी पाकिस्तानात होणारी ‘अमेरिका-तालिबान शांतीचर्चा’ रद्द झाली आहे. अफगाण तालिबानने यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले असून पुढील बैठक कतारची राजधानी दोहामध्येच होईल, असे जाहीर केले आहे. अमेरिकेने यावर दिलेल्या प्रतिक्रियेत, पाकिस्तानमधील बैठकीबाबत आमंत्रणच नव्हते, असा दावा केला.

गेल्याच आठवड्यात, अमेरिकेसोबत दुसर्‍या टप्प्यातील चर्चा करण्यासाठी अफगाण तालिबानने पाकिस्तानची निवड केली आहे आणि पाकिस्तानात अमेरिकेच्या प्रतिनिधींशी चर्चा होऊ शकते, अशी घोषणा तालिबानचा प्रवक्ता ‘झबिउल्लाह मुजाहिद’ याने केली होती. पाकिस्तानने याचे स्वागत करताना चर्चेचा हा टप्पा ‘गेम चेंजर’ ठरेल, असे संकेत दिले होते. मात्र चर्चा रद्द होण्याचा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का ठरला आहे.

याआधी अमेरिका आणि तालिबानमधील सदर चर्चा पाकिस्तानात पार पडावी आणि आपले सरकार मध्यस्थीसाठी तयार असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले होते. पण तालिबानने पाकिस्तानचा हा प्रस्ताव धुडकावला होता. कतारमधील बैठकीनंतर गेल्या आठवड्यात रशियामध्ये तालिबानच्या प्रतिनिधीमंडळाची दुसरी मोठी बैठक पार पडली. या बैठकीनंतर, सोमवारी १८ फेबु्रवारी रोजी इस्लामाबाद येथे चर्चा पार पडेल, असे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने जाहीर केले होते.

तालिबानने पाकिस्तानात बैठक घेण्याचे जाहीर केल्यानंतर त्यावर अफगाणिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. ‘पाकिस्तानात होणारी बैठक संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने मंजूर केलेल्या ठरावाचे उल्लंघन ठरते. याबाबत सुरक्षा परिषदेकडे तक्रारही करण्यात आली आहे. पाकिस्तान व तालिबानमध्ये सुरू असलेल्या हालचालींबाबत अफगाण सरकारबरोबर सल्लामसलत करण्यात आलेली नाही’, अशी नाराजी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली होती.

पाकिस्तानमध्ये होणारी चर्चा रद्द होत असतानाच अमेरिकेबरोबरील चर्चेचा पुढील टप्पा २५ फेब्रुवारीला कतारची राजधानी दोहामध्ये पार पडेल, अशी माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. दोहा शहरात तालिबानचे राजकीय कार्यालय असल्याने त्याची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अमेरिका व तालिबानमध्ये झालेल्या चर्चेचा पहिला टप्पाही दोहातच पार पडला होता.

अमेरिकेने तालिबानविषयक चर्चेसाठी नियुक्त केलेले विशेष प्रतिनिधी ‘झाल्मे खलिलझाद’ आणि तालिबानचे प्रतिनिधीमंडळ यांच्यात सदर चर्चा संपन्न झाली होती. तालिबानला अफगाणिस्तानातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील तालिबानबरोबरची चर्चा यशस्वी ठरल्याचे जाहीर केले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info