चीनच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू आहे – पंतप्रधान ली केकिआंग यांची कबुली

चीनच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू आहे – पंतप्रधान ली केकिआंग यांची कबुली

बीजिंग – ‘चीनची अर्थव्यवस्था प्रचंड दडपणाखाली असून तिची घसरण सुरू झाली आहे. जगातील दुसर्‍या क्रमाकांच्या अर्थव्यवस्थेतील ही घसरण आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत असणार्‍या दबावांमुळे होत आहे. ती रोखण्यासाठी चीन कठोर उपाययोजना करेल’, अशा शब्दात चीनचे पंतप्रधान ली केकिआंग यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेत सर्व काही आलबेल नसल्याची उघड कबुली दिली. अवघ्या २४ तासांपूर्वीच चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणार्‍या औद्योगिक उत्पादनाने १७ वर्षातील नीचांकी तळ गाठल्याचे समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर केकिआंग यांची कबुली महत्त्वाची ठरते.

चीन की अर्थव्यवस्था, गिरावट, ली केकिआंग, व्यापार युद्ध, जिम्मेदारी स्वीकारी, ww3, विकास दरगेल्या काही महिन्यांपासून चीनच्या अर्थव्यवस्थेत सातत्याने पडझड सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनच्या अर्थव्यवस्थेने तीन दशकातील नीचांकी पातळी गाठल्याचे उघड झाले होते. त्यानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेतील मुख्य घटक असणार्‍या आयात-निर्यातीसह, व्यापारातील लाभ, अंतर्गत मागणी, शेअरबाजार, गृहबांधणी क्षेत्रातील गुंतवणूक यांचे निकाल सातत्याने घसरणीचे संकेत देणारे होते.

मात्र अशा परिस्थितीतही चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून अर्थव्यवस्थेत घसरण सुरू असल्याची उघड कबुली दिली जात नव्हती. उलट चीनच्या राज्यकर्त्यांकडून नकारात्मक निकाल म्हणजे अर्थव्यवस्थेत बदल करण्यासाठी सुरू असलेल्या सुधारणांचा परिणाम असल्याचे सांगण्यात येत होते. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख वित्तसंस्था मात्र चीन मंदीच्या दिशेने चालल्याचा इशारा देऊन त्यातील धोक्यांबाबत वारंवार बजावताना दिसत होत्या. पण चीनने याकडेही दुर्लक्ष करीत अर्थव्यवस्थेची पाठराखण केली होती.

शुक्रवारी पंतप्रधान केकिआंग यांच्या वक्तव्यातून चीन प्रथमच अर्थव्यवस्थेतील घसरणीला सामोरे जाण्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. अर्थव्यवस्थेवर दबाव असल्याची व त्यात घसरण होत असल्याची चीनची कबुली आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी एक निर्णायक घटना ठरते. यापूर्वी कधीही चीनच्या प्रमुख नेत्यांनी अर्थव्यवस्थेतील नकारात्मक बाजूची जबाबदारी घेतल्याचे दिसून आले नव्हते.
चीनच्या या कबुलीमागे अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्ध व त्याबाबत सुरू असलेली चर्चा हा महत्त्वाचा घटक असावा, असा दावा काही विश्‍लेषकांकडून करण्यात येतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनबरोबर व्यापारी करारासाठी सकारात्मकता दर्शविली असली, तरी त्याबाबत विशेष घाई नसल्याचे वारंवार सूचित केले आहे. त्यामुळे चीनच्या गोटात चिंतेचे वातावरण असून व्यापारी चर्चा यशस्वी होण्यासाठी तडजोड करण्यास तयार असल्याचा संदेश चीनकडून सातत्याने देण्यात येत आहे. अर्थव्यवस्थेत घसरण सुरू असल्याची उघड कबुली हादेखील त्याचाच भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही दिवसांपूर्वी संसदेत पंतप्रधान केकिआंग यांनी, नजिकच्या काळात अर्थव्यवस्थेसमोर मोठे धोके व आव्हाने असून स्थिती गुंतागुंतीची असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचवेळी २०१९मध्ये चीनची अर्थव्यवस्था सहा टक्क्यांच्या आसपास विकासदर गाठू शकेल, असे संकेतही चीनच्या पंतप्रधानांनी दिले होते. मात्र त्यावेळीही त्यांनी घसरणीची उघडपणे कबुली दिली नव्हती.

दरम्यान, चीनच्या पंतप्रधानांनी दिलेल्या कबुलीची जागतिक अर्थव्यवस्थेकडून नकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकते, असे संकेत काही अर्थतज्ज्ञांनी दिले आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info