मनिला – ‘पाग-असा बेटांपासून चीनने दूर रहावे. ही विनंती नाही, सूचना आहे. याच्या पलिकडे जाऊन चीनने कारवाई केली, तर मी माझ्या सैनिकांना आत्मघाती हल्ल्यांचे आदेश देईन’, असे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी चीनला ठणकावले आहे. गेल्या काही दिवसांपासून फिलिपाईन्सच्या ‘पाग-असा’ बेटांना चीनच्या शेकडो जहाजांनी वेढा घातला असून चीन हे बेट ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अमेरिकेनेही चीनच्या या कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे. मात्र चीनच्या तुलनेत अतिशय छोटा देश असलेल्या फिलिपाईन्सचे आक्रमक राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी आपण चीनच्या दडपणासमोर झुकणार नसल्याचा कडक संदेश दिला असून आपण संघर्षासाठीही तयार असल्याचे चीनला बजावले आहे.
आमचे मित्र म्हणून रहा, पण ‘पाग-असा’ आणि इतर बेटांना हात लावू नका. जर चीनने या बेटांचे बरेवाईट केलेच तर माझ्या एका इशार्यावर फिलिपिनो सैनिक चीनच्या जहाजांवर आत्मघाती हल्ले चढवतील’’, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी दिली. ही धमकी देत असताना चीनबरोबरच्या मैत्रीसाठी आपण याचना करणार नसल्याचेही फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सुनावले. गेल्या दोन वर्षात चीनबरोबरच्या सहकार्याला महत्त्व देणार्या राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांच्या या धमकीने खळबळ उडवून दिली आहे.
फिलिपाईन्स आणि चीनमध्ये ‘साऊथ चायना सी’चा वाद जुना आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात ‘साऊथ चायना सी’बाबत चीनविरोधात दाखल केलेल्या खटल्यात फिलिपाईन्सला विजय मिळाला होता. तरी देखील गेली दोन वर्षे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी या सागरी क्षेत्रातील वाद बाजू सारून चीनबरोबरच्या सहकार्याला महत्त्व दिले होते. चीन हा मोठा शक्तीशाली देश असून चीनबरोबरचे युद्ध फिलिपाईन्स जिंकू शकणार नसल्याचे दुअर्ते दोन वर्षांपूर्वी म्हणाले होते. पण शुक्रवारी ‘पाग-असा’ बेटांच्या मुद्यावरुन दुअर्ते यांनी चीनला निर्णायक इशारा दिला आहे.
दरम्यान, फिलिपाईन्सच्या हद्दीतील ‘पाग-असा’ बेटाला चीनच्या २७५ जहाजांनी वेढा घालून या क्षेत्रातील तणावात भर टाकल्याची टीका अमेरिकेचे विशेषदूत जोसेफ फेल्टर यांनी केली.
दरम्यान, अमेरिका व फिलिपाईन्सच्या मरिन्समध्ये विशेष सराव सुरू होत असून यासाठी अमेरिकेची ‘युएसएस वास्प’ अॅम्फिबियस युद्धनौका सुबिक बे बेटावर दाखल झाली आहे. या युद्धनौकेवर ‘एफ-३५बी’ या अत्याधुनिक लढाऊ विमानांचा ताफा तैनात आहे. त्यामुळे चीनने ‘पाग-असा’ बेटांना आपल्या जहाजांद्वारे वेढा घालून फिलिपाईन्सवरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत मिळत आहेत. पण बेदरकारपणासाठी प्रसिद्ध असलेल्या फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला धमकी देऊन आपल्या मागे अमेरिकेचे सामर्थ्य असल्याचे संकेत दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |