सौदी अरेबियाचा पहिला अणुप्रकल्प पूर्णत्वाच्या तयारीत

सौदी अरेबियाचा पहिला अणुप्रकल्प पूर्णत्वाच्या तयारीत

वॉशिंग्टन – अमेरिका आणि इतर युरोपिय मित्रदेशांबरोबर अणुकरार करण्याच्या तयारीत असलेल्या सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय समुदायला थांगपत्ता लागू न देता पहिला अणुप्रकल्प उभारल्याचा दावा अमेरिकी वृत्तपत्राने केला आहे. राजधानी रियाधमध्ये सौदी हा अणुप्रकल्प उभारीत असून येत्या वर्षभरात सदर प्रकल्प पूर्ण होईल, असा दावा केला जातो. मात्र अण्वस्त्रप्रसारबंदी विधेयकावर स्वाक्षरी न करताच सौदीने हा अणुप्रकल्प उभारल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरातून भुवया उंचावल्या जात आहेत. तर इराण अण्वस्त्रसज्ज झालाच तर सौदी अरेबिया देखील अण्वस्त्र मिळविल्यावाचून राहणार नाही, अशी घोषणा सौदीने काही महिन्यांपूर्वी केली होती.

अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तपत्राने कम्प्युटर प्रोग्रामच्या सहाय्याने गेल्या काही महिन्यांमधील सॅटेलाईट फोटोग्राफ्स मिळविले आहेत. या फोटोग्राफ्सच्या सहाय्याने सौदी अणुप्रकल्प उभारीत असल्याचा दावा या अमेरिकी वृत्तपत्राने केला. राजधानी रियाधमधील ‘किंग अब्दुलअझिझ सिटी फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी’च्या इमारतीजवळच सौदीचा हा पहिला अणुप्रकल्प उभारला जात असल्याचे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये या अणुप्रकल्पात वेगाने बदल होत असून येत्या वर्षभरात सौदीचा पहिलावहिला अणुप्रकल्प तयार होईल, असा दावा या वृत्तपत्राने केला.

सॅटेलाईट फोटोग्राफ्स असल्यामुळे या अणुप्रकल्पातील इतर गोष्टींबाबत खुलासा होऊ शकलेला नाही. पण अणुकार्यक्रमासंबंधी कुठलाही आंतरराष्ट्रीय करार न करता सौदीने हा प्रकल्प उभारून आंतरराष्ट्रीय समुदायाला आव्हान दिल्याचे अमेरिकी वृत्तपत्राचे म्हणणे आहे. हा अणुप्रकल्प नागरी वापरासाठी असून याचा वापर अण्वस्त्रनिर्मितीसाठी होणार नाही, हे सौदीला आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून द्यावे लागेल. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या नियमांचे पालन केल्याशिवाय कुठलाही देश सौदीला सदर अणुप्रकल्पासाठी अणुइंधन पुरविणार नसल्याचेही या वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटले आहे.

अमेरिकी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या या बातमीबाबत सौदीच्या ऊर्जा विभागाने प्रतिक्रिया दिली असून आपला हा अणुप्रकल्प नागरी वापरासाठी असेल, असे सांगितले आहे. या अणुप्रकल्पाची निर्मिती आंतरराष्ट्रीय करारांनुसार झाली असून संशोधन, शैक्षणिक आणि प्रशिक्षणासाठी या अणुप्रकल्पाचा वापर केला जाणार असल्याची माहिती सौदीच्या ऊर्जा विभागाने दिली. तसेच या अणुप्रकल्पाला कुणीही भेट देऊ शकतो, असे आवाहनही सौदीने केले आहे.

सौदीने याआधीच अणुप्रकल्प उभारण्याची आणि यासाठी पाश्‍चिमात्य मित्रदेशांबरोबर करार करण्याची घोषणा केली होती. इंधनाला पर्याय म्हणून अणुऊर्जेचा वापर करणार असल्याचा इरादा सौदीने व्यक्त केला होता. किमान १६ अणुप्रकल्प उभारण्याचे सौदीने जाहीर केले होते. यासाठी सौदीने अमेरिकेशी वाटाघाटी केल्या असून अमेरिकेनेही सौदीला अणुप्रकल्प उभारून देण्याचे मान्य केले होते. पण सौदी अण्वस्त्रनिर्मितीसाठी हे अणुप्रकल्प उभारीत असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय स्तरातून झाला होता.

गेल्या वर्षी सौदीचे ‘क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान’ यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. तसेच इराण अण्वस्त्रसज्ज झाला तर सौदी देखील अण्वस्त्रे हस्तगत करण्यापासून दूर राहणार नसल्याचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी बजावले होते. यासाठी सौदीने हालचाली सुरू केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, सौदीच्या या अणुप्रकल्पाच्या निर्मितीकडे पाहिले जात आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info