चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून एक कोटी तरुणांना ‘ग्रामीण’ भागात पाठविण्याची योजना माओ यांच्या ‘सांस्कृतिक क्रांती’च्या पुनरावृत्तीचे संकेत

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून एक कोटी तरुणांना ‘ग्रामीण’ भागात पाठविण्याची योजना  माओ यांच्या ‘सांस्कृतिक क्रांती’च्या पुनरावृत्तीचे संकेत chinese-communist-party-plans-to-send-ten-million-youth-to-the-rural-areas

बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने ‘ग्रामीण’ भागाच्या विकासासाठी देशातील तब्बल एक कोटींहून अधिक तरुणांना खेड्यापाड्यांमध्ये पाठविण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. चीनमधील सांस्कृतिक, तांत्रिक व वैद्यकीय विकासाचा प्रसार ग्रामीण भागातही व्हावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र चीनमधील आघाडीच्या विश्‍लेषकांनी या योजनेमागे चीनमधील आर्थिक उलथापालथ कारणीभूत असून ‘बेरोजगारी’सारखा ज्वलंत मुद्दा लपविण्यासाठी नव्या योजनेचा वापर करण्यात येईल, असे बजावले आहे.

सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष, सांस्कृतिक क्रांती, शी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष, बीजिंग, ww3, वन बेल्ट, वन रोड

गेल्या काही वर्षात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून सातत्याने, चीनचे राष्ट्रपिता व सर्वोच्च नेते म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘माओ त्से-तुंग’ यांच्याबरोबरीचे किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ स्थान मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिनपिंग यांनी पक्षाकडून स्वतःला ‘कोअर लीडर’ म्हणून घोषित करून घेतले होते. त्यानंतर स्वतःचे विचार पक्षाच्या घटनेत सामील करून घेणे व स्थान भक्कम करण्यासाठी देशभरात सुरू केलेल्या मोहिमांमधून पक्ष तसेच देशाचे सर्वेसर्वा ही प्रतिमा तयार करून घेण्याचे प्रयत्न केले होते. सध्या पक्ष, सरकार व संरक्षणदले या तिन्हींचे प्रमुख पद जिनपिंग यांच्याकडे असून माओ यांच्या हुकुमशाहीच्या तोडीची एकाधिकारशाही निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

मात्र त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनची सामर्थ्यशाली प्रतिमा तयार करण्यात जिनपिंग फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. अमेरिकेबरोबरचे व्यापारयुद्ध व ‘वन बेल्ट, वन रोड’ योजनेवरून बसलेले धक्के यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत जोरदार उलथापालथी सुरू आहेत. अंतर्गत पातळीवरील कर्जाचे डोंगर व घटत्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे चीनमधील अनेक मोठ्या उद्योगांमध्ये धोक्याच्या घंटा वाजण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षात चीनमधील काही मोठ्या कंपन्यांनी दिवाळखोरीही जाहीर केली होती.

ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने शहरातील एक कोटींपेक्षा जास्त तरुणांना गावांमध्ये पाठविण्याची योजना लक्ष वेधून घेणारी ठरते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दारिद्य्रनिर्मूलनाच्या मोहिमेसाठी देशातील सुमारे एक कोटी नागरिकांचे स्थलांतर करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली होती.  चीनमधील सर्व २२ प्रांतांमध्ये सुरू झालेल्या मोहिमेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नसली तरी जवळपास २५ लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर झाले असावे, असे मानले जाते.

चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ दैनिकाने तरुणांना गावाकडे पाठविण्याच्या योजनेची माहिती देताना साम्यवादी क्रांतीचे प्रणेते असलेल्या ‘माओ त्से-तुंग’ यांच्या सांस्कृतिक क्रांतीचा उल्लेख केला आहे. १९६०-७०च्या दशकात राबविलेल्या या अभूतपूर्व योजनेत कोट्यवधी तरुणांना गावाकडे पाठवून विकासयोजना राबविण्याची जबाबदारी सोपविली होती. चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही वयाच्या १६व्या वर्षी ‘शांक्सी’ प्रांतातील गावात पाठवून सात वर्षे काम करून घेण्यात आले होते.

नव्या योजनेनुसार तरुणांना पाठविण्यासाठी साम्यवादी क्रांतीचा पाया असलेले भाग, प्रचंड दारिद्य्र असलेले भाग व वांशिक अल्पसंख्यांकांचे वास्तव्य असलेले भाग अशा भागांची निवड करण्यात आली आहे. २०२० सालापर्यंत योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहितीही ‘कम्युनिस्ट यूथ लीग’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

चीनमधील आघाडीचे विश्‍लेषक ‘झँग लिफन’ यांनी जिनपिंग यांच्या या अनोख्या योजनेमागे आर्थिक उलथापालथीचे कारण असल्याचा दावा केला आहे. यावर्षी तब्बल ८६ लाख पदवीधर तरुण बेरोजगार असून नजिकच्या काळात ही संख्या अधिकच वाढू शकते. ही वाढती बेरोजगारी चीनच्या सत्ताधारी राजवटीसाठी मोठी डोकेदुखी ठरेल, हे ध्यानात घेऊन अशा तरुणांना गावाकडे पाठविण्याची शक्कल लढविण्यात आली आहे, असे लिफन यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे.    

English हिंदी 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info