वॉशिंग्टन – ‘साऊथ चायना सी’च्या कृत्रिम बेटांवरील सैन्यतैनाती, झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांवरील गस्त, तसेच चीनमधील सुरक्षा यंत्रणेच्या हालचाली नियोजित करण्यासाठी चीन अमेरिकेच्याच उपग्रहांचा वापर करीत आहे. अंतराळात कार्यरत असलेल्या अमेरिकेतील बड्या कंपन्यांच्या उपग्रहांद्वारे चीन आपले लष्करी सामर्थ्य वाढवित असल्याची धक्कादायक माहिती अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तपत्राने दिली. चीनचे संरक्षण मंत्रालय तसेच गुप्तचर यंत्रणा अमेरिकी उपग्रह आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांचा वापर करीत असल्याचा दावा या वृत्तपत्राने केला.
पृथ्वीपासून सुमारे २२ हजार किलोमीटर उंचीवर भ्रमण करणार्या अमेरिकन बनावटीच्या तसेच प्रक्षेपित केलेल्या किमान नऊ उपग्रहांचा वापर चीनचे सरकार करीत आहे. अमेरिकेतील कायद्यांप्रमाणे त्यांच्या उपग्रहांवर इतर कुठलाही देश हक्क सांगू शकत नाही किंवा या उपग्रहांचा कुठल्याही मार्गाने वापर करू शकत नाही. अगदी खाजगी कंपन्यांनी प्रक्षेपित केलेल्या या उपग्रहांची दुसर्या देशाला किंवा संघटनेला विक्री देखील होऊ शकत नाही. पण या उपग्रहांचे नियंत्रण असणार्या कंपन्यांचे समभाग खरेदी करून व त्यानंतर सदर उपग्रहांचे ‘बँडविड्थ’ वापरून चीनने अमेरिकी कायद्यांना बगल दिल्याची खळबळजनक माहिती अमेरिकी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली.
गेल्या काही वर्षांमध्ये चीनने अशाच प्रकारे उपग्रह प्रक्षेपित करणार्या अमेरिकेच्या खाजगी कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहेत. चीन सरकारशी थेट संबंध असलेल्या किंवा संलग्न कंपन्यांनी अमेरिकी कंपन्यांचे समभाग प्रचंड प्रमाणात खरेदी केल्याचा दावा केला जातो. अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘बोईंग’ तसेच ‘मॅक्सर टेक्नोलॉजिज्’ या कंपन्यांनी प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमुळे चीनच्या संरक्षण क्षेत्राला मोठे सहाय्य मिळत असल्याचे अमेरिकी वृत्तपत्राने म्हटले आहे. हे उपग्रह प्रक्षेपित करणार्या या आणि अमेरिकेतील इतर खाजगी कंपन्यांनी नागरी वापरासाठी आपल्या उपग्रहांचे समभाग चिनी कंपन्यांना विकले आहेत.
यामध्ये लॉस एंजिलिस येथील ‘ग्लोबल आयपी’ या स्टार्ट अपने सुमारे ७५ टक्के हक्क एका परदेशी कंपनीला विकले होते. पण ही कंपनी चिनी असल्याचे आपल्याला माहिती नव्हते, असा खुलासा या कंपनीच्या अधिकार्याने केल्याचे अमेरिकी वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटले आहे. ‘ग्लोबल आयपी’प्रमाणे इतर खाजगी अमेरिकी कंपन्यांनी प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांच्या सहाय्याने चीन आपल्या संरक्षण सामर्थ्यात वाढ करीत असल्याची माहिती काही अधिकारी व विश्लेषकांनी दिल्याचे या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले. यासाठी उपग्रहांची ‘बँडविड्थ’ पुरेशी असल्याचा दावा अमेरिकी वृत्तपत्राने केला.
या उपग्रहांवरील बँडविड्थच्या सहाय्याने चीनने ‘साऊथ चायना सी’मध्ये उभारलेल्या कृत्रिम बेटांवर तैनात केलेल्या आपल्या सैनिकांशी संपर्क प्रस्थापित केले. त्याचबरोबर कम्युनिस्ट राजवटीचा प्रचार करण्यासाठी देखील अमेरिकी उपग्रहांचा वापर केला गेला. इतकेच नव्हे तर झिंजियांग प्रांतातील उघूर वंशिय आणि चीनमधील अल्पसंख्यांक किंवा जिनपिंग यांच्या राजवटीविरोधात निदर्शने करणार्यांवर कारवाई करण्यासाठी देखील अमेरिकेच्या उपग्रहांचा वापर होत असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.
चीनकडून अमेरिकी उपग्रहांचा होत असलेल्या वापराची ट्रम्प प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. उघूर किंवा अल्पसंख्यांकांविरोधात चीन करीत असलेल्या अमानवी कारवाईसाठी अमेरिकी उपग्रहांचा वापर होणार नाही, यासाठी अमेरिकी कंपन्यांनी उपग्रहांच्या सुरक्षेसाठी वेगाने पावले उचलावी, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले. यामुळे अमेरिकेची सुरक्षा तसेच अंतराळातील अमेरिकी उपग्रहांची सुरक्षा धोक्यात आल्याचे या वृत्तपत्राने सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल जेम्स डनफोर्ड यांनी अमेरिकी सर्च इंजिन ‘गुगल’ अमेरिकेऐवजी चीनच्या लष्कराला सहाय्य करीत असल्याचा आरोप केला होता. जनरल डनफोर्ड यांनी चीनला लष्करी माहिती पुरविणार्या अमेरिकी कंपन्यांची कानउघडणी केली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |