पेंटॅगॉनकडून गोपनीय ‘जेसन्स ग्रुप’वर बंदी

पेंटॅगॉनकडून गोपनीय ‘जेसन्स ग्रुप’वर बंदी

वॉशिंग्टन – गेली सहा दशके जगभरातील अणुकार्यक्रम, लेझर यंत्रणा व इतर महत्त्वाच्या सुरक्षाविषयक धोक्यासंबंधी, अमेरिकेला अतिशय संवदेनशील माहिती पुरविणार्‍या ‘द जेसन्स ग्रुप’ या गुप्तपणे काम करणार्‍या संघटनेकडे पाठ फिरविण्याची तयारी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही संघटना सहाय्यक ठरत नसल्याचे सांगून पेंटॅगॉनने ‘द जेसन्स ग्रुप’ बंद करण्याचे आदेश दिले.

१९६० साली स्थापना करण्यात आलेला ‘जेसन’ हा गट अमेरिकेसाठी गुप्तपणे काम करणारा महत्त्वाचा गट मानला जातो. आतापर्यंत अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय आणि ‘इंटेलिजन्स कम्युनिटी’ या विभागांद्वारे ‘जेसन’ला आवश्यक ते सहाय्य मिळत होते. पण अमेरिकेच्या सुरक्षाविषयक अभ्यासासाठी ‘जेसन’च्या सहकार्याची आवश्यकता नसल्याचे सांगून यापुढे ‘जेसन’शी अमेरिकेचा संरक्षण विभाग जोडलेला राहणार नाही, असे पेंटॅगॉनने स्पष्ट केले.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या सुरक्षाविषयक भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेला आता नव्या धोरणांची आवश्यकता असल्याची माहिती पेंटॅगॉनच्या प्रवक्त्या ‘हिदर बॅब’ यांनी दिली. त्याचबरोबर आतापर्यंत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात येणारा निधीही बंद करण्याची घोषणा पेंटॅगॉनने दिली. त्यामुळे येत्या १ मे पासून ‘जेसन’शी पेंटॅगॉनचे संबंध राहणार नाहीत. त्यामुळे येत्या काही तासात ‘जेसन’ची होणारी बैठक ही शेवटची ठरणार आहे.

पेंटॅगॉनच्या या निर्णयावर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित विभाग व अधिकार्‍यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेच्या सुरक्षाविषयक अतिशय महत्त्वाच्या योजनांमध्ये या गटाने दिलेल्या माहितीला खूप मोठे महत्त्व असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर या गटातील शास्त्रज्ञ, अभ्यासक, अधिकार्‍यांना विशेष सुरक्षा अधिकार देखील दिले गेले आहेत. ३० ते ६० सदस्यांचा सहभाग असलेला हा गट सर्वप्रथम व्हिएतनाम युद्धामुळे जगासमोर आला होता. या गटाचे सदस्य असलेल्या व्यक्ती शास्त्रज्ञ, प्राध्यापक व तज्ज्ञ म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात. अमेरिकेच्या लष्करी, गुप्तचर व इतर विभागांना उपयुक्त ठरणारी माहिती ‘जेसन’च्या या सदस्यांकडून पुरविली जात होती.

ऍसिड रेन, लेझर यंत्रणा तसेच आर्टिफिशल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा, क्वांटम कम्प्युटिंग, हायपरसोनिक क्षेपणास्त्र, सोनिक बूम अशा अनेक प्रोजेक्ट्समध्ये ‘जेसन’चा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. अमेरिकेच्या संरक्षणदलांमध्ये ‘लेझर’चा वापर करण्यात यावा, यासाठी याच गटाने मागणी लावून धरली होती. या व अशा अनेक आघाड्यांवर ‘जेसन’नेे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मोठे योगदान दिले होते, असा दावा ‘डार्पा’ तसेच अमेरिकेतील इतर संघटना व अधिकारी करीत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात पेंटॅगॉनने या गटाकडे पाठ फिरविली तर त्याचा अमेरिकेच्या सुरक्षेवर परिणाम होईल, असा दावा काही अधिकारी व संघटना करीत आहेत. पेंटॅगॉनने ‘जेसन’साठी निधी उपलब्ध करण्यास नकार दिला असला तरी या गटाने आपले संशोधन सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे.

‘जेसन’बाबत पेंटॅगॉनने घेतलेला निर्णय ट्रम्प प्रशासनाच्या बदललेल्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरणांचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधी ट्रम्प प्रशासनाने महत्त्वाच्या पदांवर असलेल्या अधिकार्‍यांवर कडक कारवाई केली होती.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info