गाझातून इस्रायलवर झालेल्या ४५० रॉकेट्सच्या मार्‍यानंतर इस्रायलकडून जबरदस्त प्रतिहल्ल्याची घोषणा

गाझातून इस्रायलवर झालेल्या ४५० रॉकेट्सच्या मार्‍यानंतर इस्रायलकडून जबरदस्त प्रतिहल्ल्याची घोषणा

जेरूसलेम – गेल्या चोवीस तासांपासून गाझातील हमास आणि इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी इस्रायलमध्ये ४५० हून अधिक रॉकेटस्चा मारा केला असून या हल्ल्यांमध्ये तीन इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. इस्रायलच्या लष्कराने गाझातील हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी कारवाई करून दहशतवादी संघटनांच्या २६० हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले. यात हमासचा नेता आणि इराणमध्ये समन्वयक असलेला कमांडर देखील ठार झाला आहे. पण ही कारवाई इथेच थांबणार नाही. गाझातील हल्ल्यांना याहून तीव्र प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन यांनी दिला आहे.

इजिप्तच्या आवाहनानंतरही गाझापट्टीतून इस्रायलच्या सीमाभागात बलुन आणि काईट बॉम्बचे हल्ले सुरू आहेत. शनिवारी गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद या दोन्ही दहशतवादी संघटनांनी इस्रायलच्या सीमाभागात तसेच प्रमुख शहरांवर रॉकेट हल्ल्यांचा वर्षाव करून संघर्षबंदी धुडकावली. इस्रायली सुरक्षा यंत्रणा व इस्रायलमधील आंतरराष्ट्रीय संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दुपारपर्यंत इस्रायलमध्ये साडे चारशेहून अधिक रॉकेटस्चा मारा झाला. अश्केलॉन, बिरशेबा या दोन शहरांवर सर्वाधिक रॉकेट हल्ले झाले. यावेळी दहशतवाद्यांनी रणगाडाभेदी रॉकेट्सचा वापर इस्रायलमधील नागरी वाहनांना लक्ष्य करण्यासाठी केल्याची माहिती समोर येत आहे. तर अश्केलॉन येथील रेल्वे रुळावरही हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये तीन नागरिकांचा बळी गेला.

या व्यतिरिक्त झिकीम, कारमिया, किबूत्झ याद मोरेचाय, मोशॅव नॅटिव्ह हॅसारा, निर अम आणि स्देरॉत या भागातही रॉकेट अलार्म वाजले. इस्रायलच्या रॉकेटभेदी ‘आयर्न डोम’ यंत्रणेने ९० टक्के रॉकेट्स भेदल्याचा दावा केला आहे. पण गाझातून झालेल्या रॉकेट हल्ल्यांची तीव्रता वाढल्याची माहिती माध्यमे देत आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असून सीमेवरील लष्कराला सर्व पर्यायांसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

रविवारी इस्रायली पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी घेतलेल्या सुरक्षाविषयक बैठकीनंतर गाझावरील हल्ले प्रचंड प्रमाणात वाढविले जातील, असा इशारा दिला. गाझातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले चढविताना कुठल्याही प्रकारची गय करू नका, असे आदेश पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इस्रायली सैनिकांना दिले आहेत. त्याचबरोबर सीमेवरील सैन्यतैनाती वाढविली आहे. गेल्या काही तासातच गाझाच्या सीमेजवळ रणगाडे, तोफांचे मोठे पथक दाखल झाले. त्यामुळे इस्रायल गाझापट्टीत घुसण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

इस्रायली लढाऊ विमानांनी गाझापट्टीत केलेल्या कारवाईत इराणशी संलग्न असलेला मोठा कमांडर ठार?झाल्याचा दावा इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी केला. हमासचा प्रमुख याह्या सिन्वरचा सहाय्यक आणि इराणकडून फंडिंग उपलब्ध करून देणारा ‘हामेद हमदान अल-खोदारी’ हा रविवारच्या इस्रायलच्या कारवाईत हल्ल्यात ठार झाला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info