तेहरान – ‘अमेरिकेने बॉम्बहल्ले चढविले तरी चालेल. पण निर्बंध आणि दबावासमोर झुकून इराण आपले स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा अमेरिकेच्या स्वाधीन करणार नाही’, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर याआधी कधीही अनुभवले नसतील अशा हल्ल्यांसाठी इराणच्या जनतेने तयार रहावे, असा संदेश इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला. तर अमेरिकेला इराणबरोबर वाटाघाटी हव्या आहेत, इराणशी युद्ध करण्यात अमेरिकेला स्वारस्य नाही’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून इराणचे राजकीय नेते तसेच लष्करी अधिकारी अमेरिका तसेच सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायलला लक्ष्य करण्याचे संकेत देत आहेत. काही तासांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या वरिष्ठ अधिकार्याने ‘पर्शियन आखाता’वर इराणची पूर्ण पकड असल्याचे म्हटले होते. या सागरी क्षेत्रातील अमेरिकेच्या युद्धनौका इराणचे काहीच वाकडे करू शकत नसल्याचा दावा या लष्करी अधिकार्याने केला होता.
याला काही तास उलटत नाही तोच इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना अमेरिकेवर टीकास्त्र सोडले. ‘वैद्यकीय आणि जीवनावश्यक वस्तूंवर निर्बंध लादून अमेरिका इराणच्या जनतेची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या या दबावापुढे इराणच्या जनतेने झुकू नये, तर अमेरिकेच्या विरोधात जोरदार प्रतिकार उभा करावा. अमेरिकेने बॉम्बहल्ले चढविले आणि यात आपल्या मुलांचाही बळी गेला किंवा ते जखमी झाले, त्यांना अटक झाली तरी चालेल. पण आपले स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा अमेरिकेच्या हवाली करू नका’, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केले.
बलिदान ही इराणची संस्कृती असून इराणच्या विकासासाठी हे बलिदानच आवश्यक असल्याचे रोहानी म्हणाले. तसेच इराणच्या जनतेने अमेरिकेच्या निर्बंधांविरोधात ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी या कार्यक्रमात सांगितले. एकटा इराण अमेरिका, आखातातील अमेरिकेचे मित्रदेश आणि इस्रायल यांना पराभूत करू शकतो, असा दावा राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केला. उदारमतवादी अशी ओळख असलेल्या इराणच्या राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्या या जहाल विधानांमुळे इराण कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. यामुळे इराण व अमेरिकेच्या वाटाघाटींची शक्यता सध्या तरी दृष्टीपथात नाही.
दरम्यान, अमेरिकेने इराणवर हल्ला चढविला तर इराक, सिरिया, लेबेनॉन आणि गाझातील इराण संलग्न दहशतवादी संघटना इराणबरोबर या संघर्षात उतरतील, अशी धमकी काही दिवसांपूर्वीच हिजबुल्लाह व इतर गटांनी दिली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |