इस्रायलने कराज प्रकल्पावर हल्ला केला होता – इराणचा गंभीर आरोप

तेहरान – इराणच्या कराज शहरातील प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप इराणने केला. इराणचा अणुकार्यक्रम बाधित करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाबरोबरील संबंध विस्कळीत करण्यासाठी इस्रायलने हे दहशतवादी हल्ले चढविल्याचे इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी म्हणाले. तसेच इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करणार्‍या इस्रायलबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी इराणने केली आहे. दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध केव्हाच सुरू झाल्याचा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच दिला होता.

कराज

तीन महिन्यांपूर्वी, २४ जून रोजी राजधानी तेहरानजवळ असलेल्या कराज शहरातील प्रकल्पावर ड्रोन्सचे हल्ले झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. यात सदर प्रकल्पाचे जबर नुकसान झाल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले होते. पण इराणचे लष्कर व सरकारसंलग्न माध्यमांनी हा दावा फेटाळला. याउलट इराणच्या सुरक्षा यंत्रणेने यशस्वीरित्या प्रकल्पावरील हल्ले उधळल्याचे इराणने जाहीर केले होते. मात्र, इस्रायली लष्कराशी संबंधित कंपनीने कराज प्रकल्पाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून सदर प्रकल्पाचे नुकसान झाल्याच्या दाव्याला दुजोरा दिला होता.

गेले तीन महिने इराणने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण सोमवारी इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी कराज प्रकल्पावरील हल्ला व यात झालेल्या नुकसानाची कबुली दिली. ‘इराणच्या अणुकार्यक्रमात वापरले जाणारे सेंट्रिफ्यूजेस व इतर संशोधनासंबंधी साहित्यांची निर्मिती करणार्‍या या प्रकल्पावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार आहे. या हल्ल्यामुळे सदर प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेरा व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा वापरत असलेल्या साहित्याचे नुकसान झाले. या हल्ल्याद्वारे इस्रायल इराण व आयोगाच्या संबंधांना हादरा देत आहे’, असा आरोप इस्लामी यांनी केला.

कराज

तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगातील इराणचे राजदूत काझेम घरीबाबादी यांनी इस्रायलच्या कारवायांबाबत आयोगाला जाब विचारला. इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविणार्‍या इस्रायलला आयोगाने इस्रायलबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी घरीबाबादी यांनी केली.

इराण व इस्रायलमध्ये फार आधीच युद्ध पेटल्याचा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वीच केला होता. गेल्या दोन वर्षांमध्ये इस्रायलने इराणच्या नातांझ व इतर अणुप्रकल्प तसेच लष्करी प्रकल्पांवर छुपे हल्ले चढविले आहेत. तसेच मोहसिन फखरीझादेह या अणुशास्त्रज्ञाची हत्या घडवून इस्रायलने इराणविरोधात युद्धच पुकारल्याचे इराणने बजावले होते. दोन दिवसांपूर्वी इराणच्या क्षेपणास्त्र तळाला आग लागून मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. या दुर्घटनेसाठी इराणने अद्याप कुणालाही दोषी धरलेले नाही. पण गेल्या दोन वर्षांपासून इराण व इस्रायलमध्ये सुरू असलेल्या छुप्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर या दुर्घटनेकडेही संशयाने पाहिले जाते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info