व्हेनेझुएलातील अराजकाच्या पार्श्‍वभूमीवर ४० लाख जणांनी देश सोडला – संयुक्त राष्ट्रसंघटनेचा अहवाल

व्हेनेझुएलातील अराजकाच्या पार्श्‍वभूमीवर  ४० लाख जणांनी देश सोडला – संयुक्त राष्ट्रसंघटनेचा अहवाल

कॅराकस/न्यूयॉर्क – व्हेनेझुएलातील आर्थिक व मानवतावादी संकट अधिक तीव्र होत चालले असून त्यामुळे देशातील तब्बल ४० लाख नागरिकांवर निर्वासित होण्याची वेळ ओढावल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेने दिला. व्हेनेझुएलातील जनता मोठ्या प्रमाणात देश सोडून जात असतानाच हुकुमशहा निकोलस मदुरो यांनी अमेरिकेवर आगपाखड करीत कोलंबियाबरोबरील सीमा पुन्हा खुल्या करण्याची घोषणा केली आहे. कोलंबिया सीमेवरून अमेरिका व अमेरिका समर्थक गट व्हेनेझुएलात हिंसाचार माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून सरकारने तीन महिन्यांपूर्वी ही सीमा बंद केली होती.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘रिफ्युजी एजन्सी’ने आपला अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात व्हेनेझुएलातील अराजकसदृश परिस्थितीची माहिती दिली आहे. इंधनसंपन्न देश म्हणून ओळखण्यात येणार्‍या व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेची गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. हुकुमशहा निकोलस मदुरो यांची धोरणे अपयशी ठरली असून देशात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू तसेच औषधांची प्रचंड टंचाई आहे. त्यातच अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था अधिकच खोलात रुतल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद करण्यात आले.

देशातील दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थितीच नागरिकांना देश सोडून जाण्यास भाग पाडत असल्याचे अहवालात सांगण्यात आले. व्हेनेझुएलातील सुमारे ४० लाख नागरिकांनी देश सोडून शेजारी देशांमध्ये निर्वासित म्हणून आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात सर्वाधिक १३ लाख नागरिकांनी कोलंबियात आश्रय घेतला आहे. त्यापाठोपाठ ब्राझिल, पेरु, चिली, अर्जेंटिना या देशांमध्ये व्हेनेझुएलाचे नागरिक आश्रय घेत असल्याचे समोर आले आहे.

युद्ध व अंतर्गत संघर्ष वगळता आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी ठरलेल्या देशांमध्ये व्हेनेझुएलाचे अपयश सर्वात मोठे व भयंकर असेल, असा इशारा वरिष्ठ अर्थतज्ज्ञ केनेथ रॉजॉफ यांनी गेल्याच महिन्यात दिला होता. अर्थतज्ज्ञ रॉजॉफ यांनी व्हेनेझुएलाची तुलना ‘मुअम्मर गद्दाफी’ यांच्या मृत्यूनंतर लिबियात निर्माण झालेल्या स्थितीशी केली होती. मात्र लिबियात युद्ध सुरू होते, याकडे लक्ष वेधून व्हेनेझुएलातील जनता मात्र चुकीची धोरणे व निर्णयांमुळे देशोधडीला लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

देशातील जनतेचे समर्थन गमावलेले मदुरो रशिया, चीन व क्युबा यासारख्या देशांच्या सहाय्याने कारभार हाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी देशातील इंधन तळ, सरकारी जागा व मोकळी असणारी बेटे या देशांच्या ताब्यात देण्यात आल्याचे समोर आले आहे. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सोन्याची विक्रीही सुरू असली तरी त्याचा सामान्य जनतेला काहीही फायदा झालेला नाही, याकडे विश्‍लेषक तसेच तज्ज्ञांनी लक्ष वेधले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info