नवी दिल्ली – अमेरिका, रशिया आणि चीनने अंतराळ युद्धाची जय्यत तयारी केल्याचे समोर येत असताना, भारतानेही या आघाडीवर महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक बैठकीत अंतराळ युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. ‘डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी’ (डीएसआरए) हे या नव्या यंत्रणेचे नाव असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेची ‘स्पेस फोर्स’ तयार करणार असल्याची घोषणा केली. रशिया व चीन या देशांनी अंतराळ क्षेत्रात आघाडी घेतली असून अंतराळातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेला हा निर्णय?घेणे अनिवार्य असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता.
यावर रशिया आणि चीनची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. या दोन्ही देशांनी अमेरिका अंतराळाचे लष्करीकरण करीत असल्याचा आरोप केला होता. तसेच अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’चा सामना करण्यासाठी आपणही याबाबत आवश्यक ते निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेत रशिया व चीनने दिले होते.
पुढच्या काळात अंतराळ ही देखील प्रमुख युद्धभूमी असेल, असा दावा विश्लेषकांकडून केला जातो. किंबहुना याची तयारी फार आधीपासूनच सुरू झाल्याचे काही विश्लेषकांनी बजावले आहे. या पार्श्वभूमीवर, भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक बैठकीत ‘डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी’च्या (डीएसआरए) स्थापनेचा निर्णय घेतला आहे. ही यंत्रणा अंतराळ युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे व त्यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित करील. या संशोधनाच्या माध्यमातून ‘डिफेन्स स्पेस एजन्सी’ला सहाय्य करण्याचे काम ‘डीएसआरए’द्वारे केले जाईल.
सध्या वायुसेनेच्या ‘एअर व्हाईस मार्शल’ दर्जाचा अधिकारी ‘डीएसआरए’चे नेतृत्त्व करणार असल्याचे सांगितले जाते. तसेच ‘डीएसआरए’ हळुहळू देशाच्या अवकाश क्षेत्राचे नियंत्रण हाती घेईल. ‘डीएसआरए’ तिन्ही संरक्षणदलांशी समन्वय राखून कार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जवळपास दोन महिन्यांपूर्वी भारताने ‘मिशन शक्ती’ राबवून उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. याद्वारे भारताने आपलाच उपग्रह भेदला व आपली क्षमता सार्या जगाला दाखवून दिली होती. भारताच्या या चाचणीवर चीनमधून चिंता व्यक्त करण्यात आली होती. याआधी चीनने अशी चाचणी करून जागतिक पातळीवर खळबळ माजविली होती.
मात्र त्यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर टीकेची झोड उठविली होती. पण भारताबाबत मात्र आंतरराष्ट्रीय समुदाय पक्षात करीत असून याबाबत भारतावर कुणीही टीका केली नाही, असा ठपका चीनच्या सरकारी माध्यमांनी ठेवला होता.
भारताच्या या चाचणीनंतर, चीनने लेझर व इलेक्ट्रोमॅग्नेटिक शस्त्रांच्या चाचणीचा सपाटा लावला होता. अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या वैमानिकांवर चीनने लेझरचे हल्ले चढविल्याचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर, अंतराळ युद्धाच्या सज्जतेबाबत भारताने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरते. अंतराळ क्षेत्रातील देशाचे हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी भारताला ही क्षमता प्राप्त करणे अत्यावश्यक बनले असून तिन्ही संरक्षणदलांच्या प्रमुखांनी तसेच सामरिक विश्लेषकांनी भारताच्या नेतृत्त्वाला याची वेळोवेळी जाणीव करून दिली होती.
दरम्यान, जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत ‘स्पेस वॉर’ अर्थात अंतराळ युद्धाचा सराव करणार असल्याची माहिती उघड झाली आहे. ‘इंडस्पेसएक्स’ असे या युद्धसरावाचे नाव असून हा ‘टेबलटॉप’ युद्धसराव असेल, असे सांगितले जाते. मात्र या युद्धसरावात लष्कर तसेच विज्ञान क्षेत्रातील अधिकारी व तज्ज्ञ सहभागी होतील, अशी माहिती दिली जाते. अशा स्वरुपाचा युद्धसराव भारताने पहिल्यांदाच आयोजित केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |