वॉशिंग्टन/तेहरान – ओमानच्या आखातात इंधनवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यांसाठी इराणच जबाबदार असल्याचा ठपका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांनी ठेवला. इराणच्या या हल्ल्यानंतर अमेरिका स्वस्थ बसू शकत नाही, असा जळजळीत इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ‘माईक पॉम्पिओ’ यांनी इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यासाठी इराणच जबाबदार असल्याचे पुरावे व्हिडिओद्वारे प्रसिद्ध केले. त्यानंतर ब्रिटन, सौदी अरेबिया आणि युएई’ने देखील या हल्ल्यासाठी इराणवर ठपका ठेवला. पण अमेरिकेकडे सबळ पुरावे नसल्याचे सांगून इराणने हे आरोप फेटाळले.
गुरुवारी पहाटे ओमानच्या आखातात नॉर्वे आणि जपानच्या इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्याच्या घटनेनंतर या सागरी क्षेत्रातील घडामोडींनी वेग वाढला आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेने इराणची कोंडी सुरू केली आहे. महिन्याभरापूर्वी ‘संयुक्त अरब अमिरात’च्या (युएई) फुजैराह बंदराजवळ तसेच गुरुवारी ओमानच्या आखातात इंधनवाहू जहाजांवरील हल्ले इराणनेच घडविल्याचे सांगितले. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आपण हा दावा करीत असल्याचे पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले.
यासाठी येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी सौदीच्या इंधनपाईपलाईनवर चढविलेल्या ड्रोन हल्ल्याचा दाखला परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी दिला. त्यामुळे इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्याची शक्यता नाकारताच येत नसल्याचे पॉम्पिओ म्हणाले. यानंतर अमेरिकेच्या लष्कराने जपानच्या इंधनवाहू जहाजाचा फोटोग्राफ आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले. यापैकी व्हिडिओमध्ये गस्ती जहाजातून आलेले इराणचे जवान जपानच्या ‘कोकूका’ जहाजातून स्फोट न झालेले सुरूंग काढून नेताना दाखविले आहे. तर फोटोग्राफमध्ये जपानच्या जहाजावर दोन ठिकाणी हल्ले झाल्याचे दिसत आहे.
या दोन्ही पुराव्यातून इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांसाठी इराणच जबाबबदार असल्याचे अमेरिकेच्या लष्कराने दाखवून दिले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीदेखील इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांबाबत अमेरिकेने जमा केलेल्या पुराव्यांमध्ये सगळीकडे इराणचे नाव असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या लष्कराच्या व्हिडिओनंतर इराणचे पितळ जगासमोर उघडे पडल्याचे ट्रम्प म्हणाले. ‘सध्या तरी अमेरिका आखातातील घडामोडींवर नजर ठेवणार आहे. पण अमेरिका फार काळ स्वस्थ बसणार नाही’, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांसाठी इराण दोषी असल्याचे उघड झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक सुरक्षेला इराणपासून असलेला धोका ओळखावा, असे आवाहन अमेरिकेने केले. ब्रिटन, सौदी अरेबिया आणि ‘युएई’ने देखील इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांसाठी इराणलाच जबाबदार धरले. तर अमेरिका कुठल्याही ठोस पुराव्याशिवाय इराणवर आरोप करीत असल्याचा दावा इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी केला. अमेरिका व मित्रदेशांनी इराणला अडकविण्यासाठी हा सापळा रचल्याचा प्रत्यारोप परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी केला.
दरम्यान, आखातातील तणाव कमी करण्यासाठी संबंधित देशांनी इराणबरोबर चर्चा करावी, असे आवाहन चीनने केले आहे. पण इंधनवाहू जहाजांवर हल्ले होत असताना इराणबरोबर चर्चा करणे घाईचे ठरेल, असे सांगून ट्रम्प यांनी वाटाघाटीची शक्यता फेटाळली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |