लंडन: इराणवर हल्ला चढविला, तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असा इशारा रशिया व चीनने दिला. या दोन्ही देशांची ही भूमिका इराणला बळ देणारी ठरते आहे. २०१५ साली झालेल्या अणुकरारावर अजूनही ठाम असलेल्या युरोपिय देशांनीही अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी जोरदार राजनैतिक हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री रविवारी इराणला भेट देणार आहेत. तर दुसर्या बाजूला सौदी अरेबियाने इराणवर कठोर कारवाई व्हावी व या देशाला धडा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या ब्रिटनच्या दौर्यावर असलेले सौदीचे परराष्ट्रमंत्री अदेल अल-जुबेर यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर पर्शियन आखात व आखाती क्षेत्रातील परिस्थिती स्फोटक बनली आहे. अमेरिका इराणवर कुठल्याही क्षणी हल्ला करू शकेल, अशी स्थिती असताना, अमेरिकेचे स्पर्धक देश असलेल्या रशिया व चीनने इराणच्या बाजूने प्रतिक्रिया नोंदवून अमेरिकेला संयम दाखविण्याचा सल्ला दिला. अमेरिकेने इराणवर हल्ला चढविला, तर त्यानंतरची परिस्थिती कुणाच्याही नियंत्रणात राहणार नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले होते. अमेरिकेच्या इराणवरील लष्करी कारवाईमुळे ज्यातून काय बाहेर येईल, याची कल्पना करता येणार नाही, असा ‘पँडोराज् बॉक्स’ उघडला जाईल, असे चीनचे म्हणणे आहे. रशिया व चीनच्या या भूमिकेमुळे इराणला अधिक पाठबळ मिळत असल्याचे दिसू लागले असून दोन्ही देशांनी याआधीही इराणधार्जिणी भूमिका स्वीकारली होती.
तर ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या अणुकरारात सहभागी झालेल्या देशांनी इराणने संयम दाखवावा, अशी मागणी करून परिस्थिती चिघळू नये यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. रविवारी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री इराणच्या दौर्यावर जाणार आहेत. आपल्या या भेटीत ते इराणने अधिक आक्रमक भूमिका घेऊन संघर्षाला तोंड फोडू नये, यासाठी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री विशेष प्रयत्न करतील. मात्र यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध होत असतानाच, सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री मात्र ब्रिटनने इराणबाबतचे धोरण बदलावे, यासाठी आपला प्रभाव वापरत आहेत. सध्या ब्रिटनच्या दौर्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जुबेर यांनी इराणवरील लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. इराणने इंधनाची वाहतूक करणार्या जहाजांवर हल्ले चढवून या क्षेत्रात कमालीचे अस्थैर्य माजविले आहे. त्यामुळे इराणवर लष्करी कारवाई करणे भाग असून हा धडा मिळाल्याखेरीज इराण सुधारणार नाही, असा सौदीचा दावा आहे. यासाठी अल-जुबेर ब्रिटनमध्ये ‘लॉबिंग’ करीत असल्याची माहिती माध्यमांनी दिली.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी याची माहिती दिली. दोन्ही नेत्यांनी इराणकडून निर्माण झालेला धोका व आखाती क्षेत्रातील स्थैर्य आणि इंधनाच्या दरात झालेल्या वाढीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले. इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर इंधनाच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली असून पुढच्या काळात इंधनदरांचा विस्फोट होईल, अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. तसे झाले तर त्याचे भयावह परिणाम सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना झेलावे लागतील. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व सौदीच्या क्राऊन प्रिन्समध्ये झालेल्या चर्चेत इंधनाच्या दराचा आलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
English हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |