सिरियाला अवैधरित्या इंधनपुरवठा करणारे  इराणचे इंधनवाहू जहाज ब्रिटनने पकडले  – इराणकडून प्रत्युत्तराची धमकी

सिरियाला अवैधरित्या इंधनपुरवठा करणारे  इराणचे इंधनवाहू जहाज ब्रिटनने पकडले  – इराणकडून प्रत्युत्तराची धमकी

तेहरान  – सिरियाला इंधनपुरवठा करण्यासाठी निघालेले इराणचा इंधनवाहू टँकर ब्रिटनच्या नौदलाने ताब्यात घेतला. युरोपिय महासंघाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून इराण सिरियाला इंधनपुरवठा करीत असल्याचा आरोप करून ब्रिटनने ही कारवाई केली. पण या कारवाईमुळे खवळलेल्या इराणने ब्रिटनला जशास तसे उत्तर देण्याची धमकी दिली. इराण देखील पर्शियन आखातातून प्रवास करणारे ब्रिटनचे इंधनवाहू टँकर ताब्यात घेईल, अशी धमकी इराणने दिला आहे. आठवडाभरापूर्वी ब्रिटनने या क्षेत्रात आपल्या मरिन्सचे पथक तैनात केले आहे.

स्पेनच्या दक्षिणेकडील ‘जिब्राल्टर’ हा ब्रिटनचा अधिकृत भूभाग आहे. गुरुवारी रात्री जिब्राल्टरच्या सागरी हद्दीजवळून इराणचे ‘ग्रेस १’ टँकर सिरियासाठी प्रवास करीत होते. सदर टँकर भूमध्य समुद्रात दाखल होण्याआधीच ब्रिटनच्या ‘रॉयल मरिन्स’नी कारवाई करून ‘ग्रेस १’चा ताबा घेतला. ब्रिटनच्या या कारवाईवर इराणने संताप व्यक्त करून ब्रिटनच्या राजदूताला समन्स बजावले. ब्रिटनच्या नौदलाने आपल्या टँकरवर केलेली कारवाई बेकायदेशीर असून याबाबत खुलासा द्यावा, अशी मागणी केली. ही कारवाई म्हणजे चाचेगिरी ठरते, अशी टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

पण इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’चे माजी वरिष्ठ अधिकारी ‘मोहसेन रेझाई’ यांनी थेट ब्रिटनच्या इंधनवाहू टँकरवर कारवाई करण्याची सूचना केली. ‘ब्रिटनने जर इराणच्या इंधनवाहू टँकरची सुटका केली नाही तर पर्शियन आखातातून प्रवास करणार्‍या ब्रिटनच्या टँकरला ताब्यात घेणे हे इराणचे कर्तव्यच ठरते’, अशी धमकी रेझाई यांनी दिली. ‘गेल्या चाळीस वर्षांच्या इतिहासात इराणने कधीच दुसर्‍या देशावर हल्ला चढविला नाही. तसेच आपल्यावरील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यातही इराण कसूर करत नाही’, असा इशारा रेझाई यांनी दिला.

गेल्या काही आठवड्यांमध्ये पर्शियन आखातात सहा इंधनवाहू टँकर्सवर झालेल्या हल्ल्यानंतर या क्षेत्रातील तणाव वाढला आहे. या हल्ल्यांमागे इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्स व इराणसंलग्न गट असल्याचा आरोप अमेरिका व सौदी अरेबिया करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने पर्शियन आखातात युद्धनौका, बॉम्बर्स आणि स्टेल्थ विमाने तैनात केली आहेत.

तर ब्रिटनने देखील आपल्या इंधनवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी मरिन्सचे पथक तैनात केले होते. त्यामुळे जिब्राल्टरच्या घटनेनंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने पर्शियन आखातात आगळीक केलीच तर अमेरिका व ब्रिटनकडून यावर प्रतिक्रिया उमटून पर्शियन आखातातील तणाव बळावेल, असा दावा युरोपिय माध्यमे करीत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info