लंडन – ‘ब्रिटन इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असून आपल्यासमोर आव्हानांचे पहाड उभे आहेत. मात्र ३१ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडणार आहे.आपण सर्व त्यासाठी वचनबद्ध आहोत. यात कोणत्याही प्रकारे जर-तर, पण-परंतु आडवे येणार नाहीत’, अशा शब्दात ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपली प्राथमिकता स्पष्ट केली. ब्रिटनची एकजुट आणि ब्रिटनला सर्वोत्तम देश बनविण्यासाठी ही गोष्ट आवश्यक असल्याचा दावा पंतप्रधान जॉन्सन यांनी केला.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर तोडगा काढण्यात आलेल्या अपयशाचे कारण पुढे करून ७ जूनला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ पक्षातील प्रक्रियेनुसार मतदान होऊन बोरिस जॉन्सन यांची पक्षाचे नवे नेते व पंतप्रधान म्हणून निवड झाली. ‘नो डील’चे कट्टर समर्थक असणारे जॉन्सन यांनी ‘ब्रेक्झिट’च्याच मुद्यावर पंतप्रधान मे यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतर मे यांच्या नेतृत्त्वाला उघड आव्हान देऊन जॉन्सन यांनी त्यांच्यावरील दबाव कायम ठेवला होता.
उजव्या विचारसरणीकडे असलेला कल, सतत आक्रमक भूमिका, सडेतोड व वादग्रस्त वक्तव्ये आणि कट्टरपंथियांच्या वाढत्या प्रभावाला असलेला विरोध ही जॉन्सन यांची ओळख आहे. बुधवारी ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रमुख ‘क्वीन एलिझाबेथ’ यांची भेट घेतल्यानंतर बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करताना ‘ब्रेक्झिट’ला कडवे समर्थन व विश्वासातील निकटवर्तिय व्यक्ती या दोन निकषांचा वापर केला. त्याचवेळी माजी पंतप्रधान मे यांच्या मंत्रिमंडळातील तब्बल १७ मंत्र्यांची हकालपट्टी करून पक्षांतर्गत विरोधकांना कडक संदेश दिला.
माजी पंतप्रधान मे यांनी हकालपट्टी केलेल्या भारतीय वंशाच्या खासदार प्रीति पटेल यांची ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी गृहमंत्री व पाकिस्तानी वंशाचे खासदार साजिद जाविद यांचे देशाचे नवे अर्थमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. यापूर्वी ‘बे्रक्झिट सेक्रेटरी’ म्हणून काम पाहिलेले डॉमिनिक राब ब्रिटनचे नवे परराष्ट्रमंत्री बनले आहेत. राब हे जॉन्सन यांचे ‘डेप्युटी’ म्हणून जबाबदारी हाताळतील, असे संकेत सूत्रांकडून देण्यात येत आहेत. जॉन्सन यांचे विरोधक असणार्या ‘मायकल गोव’ यांची ‘नो डील मिनिस्टर’ म्हणून नेमणूक झाली असून ब्रेक्झिटच्या मुद्यावर आपत्कालिन परिस्थिती हाताळण्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
मंत्रिमंडळाच्या घोषणेनंतर झालेल्या पहिल्या बैठकीत तसेच संसदेत पंतप्रधान जॉन्सन यांनी ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावरील आक्रमक भूमिकेचे जोरदार समर्थन केले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोणत्याही परिस्थितीत ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडणारच ही ग्वाही देताना त्यासाठी कोणतीही नवी तडजोड केली जाणार नसल्याचे जॉन्सन यांनी सांगितले. महासंघातून बाहेर पडताना ‘ईयू’कडून हटवादी भूमिका घेतली गेल्यास करारातील ३९ अब्ज पौंडांचा निधी ब्रिटन देणार नाही, असा इशाराही पंतप्रधानांनी दिला.
लंडनचे माजी महापौर म्हणून प्रसिद्धीस आलेल्या जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदावरील निवडीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉन्सन यांच्या निवडीबद्दल प्रशंसा केली आहे तर महासंघ व युरोपातील नेत्यांनी सावधगिरीची प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान जॉन्सन यांची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील त्यांची भूमिका व संसदेतील भाषण ट्रम्प यांच्या धोरणांशी साम्य दाखविणारे आहे, असा दावा प्रसारमाध्यमे करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |