गाझा व लेबेनॉनमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर इस्रायलचे हल्ले

गाझा व लेबेनॉनमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर इस्रायलचे हल्ले

जेरूसलेम – गाझापट्टीतील दहशतवाद्यांनी रविवारी रात्री इस्रायलवर तीन रॉकेट हल्ले चढविले. यानंतर खवळलेल्या इस्रायली लष्कराने गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले. तर पुढच्या काही मिनिटात इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनमधील ‘पीएफएलपी’ या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ले चढविले. एका रात्रीत इस्रायलने गाझा व लेबेनॉनमध्ये हल्ले चढवून आपण दोन्ही आघाड्यांवर युद्धासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.

इस्रायली लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशीरा गाझापट्टीतून दक्षिण इस्रायलच्या स्देरॉत शहराच्या दिशेने तीन रॉकेट हल्ले चढविण्यात आले. इस्रायली लष्कराने सीमेवर याआधीच तैनात केलेल्या ‘आयर्न डोम’ यंत्रणेने यापैकी दोन रॉकेट हवेतच भेदली. तर एक रॉकेट ‘रूट ३४’ या महामार्गावर कोसळले. गाझातून रॉकेटचा मारा झाल्यानंतर स्देरॉत व आसपासच्या शहरात सायरन वाजल्यामुळे इस्रायली जनतेने वेळीच सुरक्षित भुयारांमध्ये आसरा घेतला. त्यामुळे जीवितहानी टळली.

यानंतर इस्रायली लष्कराने पुढच्या काही मिनिटातच गाझापट्टीवर हल्ले चढविले. इस्रायलची लढाऊ विमाने आणि लष्कराने संयुक्त कारवाई करून हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले. गाझापट्टीच्या उत्तरेकडील हमासचे कमांड सेंटर आणि शस्त्रास्त्रांचे कोठार या हल्ल्यात नष्ट करण्यात आले. इस्रायली लष्कराच्या हल्ल्याची पूर्वकल्पना असलेल्या हमासने आपल्या दहशतवाद्यांना आधीच इथून हलविले होते, अशी माहिती इस्रायली लष्कराने दिली.

यानंतर काही मिनिटातच इस्रायली वायुसेनेने लेबेनॉनच्या उत्तरेकडील ‘बेका वॅली’ या डोंगराळ भागातील ‘कुसाया’ भागात हवाई हल्ले चढविले. इस्रायली लढाऊ विमाने आणि ड्रोन्सने ही कारवाई केली. ‘कुसाया’ या ठिकाणी ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन’ (पीएफएलपी) या इराणसमर्थक दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्यात आले. या हल्ल्यात ‘पीएफएलपी’चे मुख्यालय बेचिराख झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याचे हिजबुल्लाह समर्थक स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

लेबेनॉनमधील ‘पीएफएलपी’ ही पॅलेस्टिनी संघटना इस्रायलविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचे पुरावे याआधी समोर आले होते. त्यामुळे अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युरोपिय महासंघाने फार आधीच या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे.

दरम्यान, येत्या काळात इस्रायलला एकाचवेळी अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागेल, असा इशारा इस्रायली लष्करी अधिकार्‍यांनी काही आठवड्यांपूर्वी दिला होता. यामध्ये गाझातील हमास, इस्लामिक जिहाद तर लेबेनॉनमधील हिजबुल्लाह आणि सिरियातील इराण, हिजबुल्लाह व इराणसंलग्न गट एकाच वेळी इस्रायलला लक्ष्य करतील, असे या अधिकार्‍यांनी बजावले होते. रविवारी रात्रीत गाझा व लेबेनॉनमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले चढवून इस्रायलने आपल्याकडे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढण्याची क्षमता व धमक आहे, हे दाखवून दिले.

इस्रायलला लेबेनॉनवरील हल्ल्याचे लवकरच उत्तर मिळेल – हिजबुल्लाहप्रमुखाची धमकी

बैरूत – हवाईहद्द ओलांडून लेबेनॉनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणार्‍या इस्रायलच्या ड्रोन हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाने दिला. यापुढे इस्रायलचा एकही ड्रोन लेबेनॉनमधून माघारी जाणार नाही, प्रत्येक ड्रोन पाडले जाईल, अशी घोषणा हिजबुल्लाह प्रमुखाने केली. लेबेनॉनमधील जनतेला एका व्हिडिओद्वारे संबोधित करताना नसरल्लाने इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यांवर टीका केली. हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर आत्मघाती हल्ले चढविण्याच्या इराद्याने इस्रायलने हे ड्रोन्स लेबेनॉनमध्ये पाठविले होते. पण इस्रायल आपल्या इराद्यांमध्ये यशस्वी होऊ शकला नाही, असा दावा नसरल्लाने केला. शनिवारी रात्री लेबेनॉनची राजधानी बैरूतमधील हिजबुल्लाहच्या इमारतीवर एक ड्रोन कोसळले. तर दुसरे ड्रोन जवळच्या निर्जन भागात पडले होते. हिजबुल्लाह दावा करीत असलेल्या दोन ड्रोन्सबाबत इस्रायलने कुठलीही माहिती दिलेली नाही.

सिरिया, इराक व लेबेनॉनमधील हल्ल्यांचे इस्रायलला परिणाम भोगावे लागतील – इराणचे जनरल कासेम सुलेमानी

तेहरान – ‘सिरिया, इराक आणि लेबेनॉनमध्ये हवाई हल्ले चढवून इस्रायलने आपला मुर्खपणा सिद्ध केला आहे. या हल्ल्यांबरोबर इस्रायलने आपल्या विनाशाच्या दिशेने पाऊल उचलले असून यापुढे इस्रायलने परिणामांसाठी तयार रहावे’, अशी धमकी इराणच्या ‘कुद्स फोर्सेस’चे प्रमुख जनरल कासेम सुलेमानी यांनी दिली.

इस्रायल आपल्या अस्तित्वासाठी अखेरचा संघर्ष करीत असल्याचा दावा जनरल सुलेमानी यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये केला. सिरियातून इस्रायलवर आत्मघाती ड्रोन हल्ले चढविण्याच्या तयारीत असलेल्या इराणच्या जवानांना इस्रायलने रविवारी पहाटेच्या हवाई हल्ल्यात ठार केले होते. या कारवाईनंतर जनरल सुलेमानी यांच्याकडून ही प्रतिक्रिया उमटली आहे. जनरल सुलेमानी यांच्या नेतृत्वाखाली इराण व हिजबुल्लाहने इस्रायलवर ड्रोन हल्ल्याची योजना आखली होती. इस्रायलच्या हवाई हल्ल्याआधी जनरल सुलेमानी यांनी दमास्कसजवळच्या तळाला भेट दिल्याचा दावा इस्रायली लष्कर करीत आहे. पण सिरियामध्ये आपले लष्करी तळ नसल्याचे इराणचे म्हणणे आहे. मात्र इराणचा हा दावा खोटा असल्याचे सांगून सिरियातील हल्ल्यात इराणचा एक जवान व हिजबुल्लाहचे दोन दहशतवादी ठार झाल्याचे इस्रायलने जाहीर केले आहे. या दोन्ही दहशतवाद्यांची नावे व फोटोग्राफ्सही इस्रायली लष्कराने प्रसिद्ध केले आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info