लंडन – जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता वाढत असल्याचे इशारे वारंवार समोर येत असतानाच मध्यवर्ती बँका व गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्यातील शाश्वत गुंतवणुकीकडे वळविल्याचे उघड झाले. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ या आंतरराष्ट्रीय गटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, एप्रिल ते जून २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत सोन्याची मागणी तब्बल १ हजार १२३ टनांवर गेल्याची माहिती देण्यात आली. या वाढीमागे मध्यवर्ती बँकांच्या खरेदीबरोबरच सोन्याचे पाठबळ असलेल्या ‘ईटीएफ’मधील(एक्सेंज ट्रेडेड फंड्स) वाढलेली गुंतवणूक प्रमुख कारण ठरली आहे.
गेल्या तीन वर्षात सोन्याच्या मागणीत हळुहळू वाढ होत असून सोन्याचे दरही वाढत आहेत. २०१७ साली सोन्याची वार्षिक मागणी ४,१५९ टन होती तर २०१८ साली ती वाढून ४,३४५ टनांवर पोहोचली होती. यावर्षी पहिल्या सहा महिन्यातच सोन्याच्या मागणीने २ हजार १७६ टनांचा टप्पा ओलांडला आहे. जून महिन्यात सोन्याचे दर विक्रमी १,४०० डॉलर्सवर पोहोचल्यानंतरही मागणी वाढणे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर १,४४० डॉलर्स प्रति औंस(२८.३५ ग्रॅम) असे नोंदविण्यात आले.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या चांगली कामगिरी नोंदवित असून २०१९सालच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये शेअरबाजारांमध्येही वाढ नोंदविण्यात आली होती. यापूर्वी अमेरिकी अर्थव्यवस्था, डॉलरचे मूल्य आणि सोन्याची मागणी यांची कामगिरी परस्परविरोधी होत असल्याचे सातत्याने दिसून आले होते. मात्र गेल्या काही महिन्यात हे चित्र बदललेले दिसत असून यावेळी अमेरिकी अर्थव्यवस्था व डॉलरची
स्थिती चांगली असतानाही सोन्यातील गुंतवणूक व मागणी सातत्याने वाढती राहिल्याचे दिसत
आहे.
‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या तीन महिन्यात सोन्याची मागणी १,१२३ टनांवर जाऊन पोहोचली आहे. २०१९च्या पहिल्या तीन महिन्यात सोन्याची मागणी तब्बल एक हजार ५३ टनांहून अधिक नोंदविण्यात आली होती. एप्रिल ते जून या दुसर्या तिमाहीतील वाढीमागे, मध्यवर्ती बँकांची वाढती खरेदी आणि सोन्याचे पाठबळ असलेल्या ‘ईटीएफ’मधील(एक्सेंज ट्रेडेड फंड्स) वाढलेली गुंतवणूक हे घटक कारणीभूत ठरले आहेत.
एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये मध्यवर्ती बँकांनी जवळपास २२५ टन सोने खरेदी केले असून त्यात पोलंड, रशिया व चीन हे देश आघाडीवर आहेत. पोलंडने एप्रिल ते जून या कालावधीत तब्बल १०० टन सोने खरेदी केल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. रशिया तसेच चीनच्या मध्यवर्ती बँकेने याच कालावधीत प्रत्येकी सुमारे ४० टन सोने खरेदी केले. त्याचवेळी भारत, कझाकस्तान, तुर्की यासारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडूनही सोन्याची खरेदी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सोन्याच्या मागणीत होत असलेली वाढ आर्थिक अनिश्चितेचे संकेत देत आहे. अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेले व्यापारयुद्ध व अमेरिकेचा युरोपिय देशांबरोबरील व्यापारी वाद याचा ताण जागतिक अर्थव्यवस्थेवर येत आहे. चीनसारखा देश याच्या दडपणाखाली आला असून यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारल्याचे दिसते.
भारतातील सोन्याची मागणी १३ टक्क्यांनी वाढली
मुंबई – २०१९ सालच्या दुसर्या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी तब्बल १३ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले. सोन्याचे दर व विविध सण तसेच लग्नसराईनिमित्त होणारी खरेदी हे दोन घटक यासाठी कारणीभूत ठरल्याची नोंद ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ या आंतरराष्ट्रीय गटाच्या अहवालात घेण्यात आली आहे. एप्रिल ते जून २०१९ या काळात भारतातील सोन्याची मागणी २१३ टनांवर गेल्याची माहिती ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने दिली. यात दागिन्यांच्या मागणीचा हिस्सा तब्बल १६८.६ टनांचा आहे.
सोन्याची नाणी व बारच्या मागणीत पाच टक्क्यांची तर सोन्यातील गुंतवणुकीत १३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. भारताची मध्यवर्ती बँक ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने या वर्षात आतापर्यंत १७ टनांहून अधिक सोन्याची खरेदी केल्याचेही समोर आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |