वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिका व चीन यांच्यात गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा तीव्र भडका उडाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या ५५० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर कर लादण्याची घोषणा केली आहे. हे कर पुढील दोन महिन्यात लागू होतील. शुक्रवारी चीनने अमेरिकेच्या ७५ अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर कर लादण्याचे जाहीर केले होते. त्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन ट्रम्प यांनी अमेरिकेतील चीनच्या संपूर्ण आयातीला लक्ष्य केले. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या नव्या घोषणेने जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमधील व्यापारयुद्ध संपुष्टात येण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे.
शुक्रवारी चीनच्या ‘स्टेट कौन्सिल’ने अमेरिकेच्या ७५ अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर ५ ते १० टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. हे कर सप्टेंबर महिन्यापासून लागू होतील, असे चीनने स्पष्ट केले होते. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी व्यापारयुद्धाबाबत दिलेल्या धमक्यांना प्रत्युत्तर म्हणून हे कर लादण्यात येत असल्याचा खुलासा चीनने केला होता. चीनच्या या घोषणेवर अमेरिकेची तत्काळ प्रतिक्रिया उमटली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चीनवर आगपाखड करीत नवे कर लादत असल्याचे जाहीर केले. ‘चीन गेली अनेक वर्षे व्यापारात अमेरिकेचा गैरफायदा उचलत आहे. अमेरिका चीनबरोबरील व्यापारामध्ये वर्षानुवर्षे शेकडो अब्जावधी डॉलर्स गमावत आहे. याआधीच्या क्लिंटन, बुश व ओबामा प्रशासनाने याबाबत काहीही केले नव्हते. पण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी ही गोष्ट अधिक काळ खपवून घेऊ शकत नाही. चीनने अमेरिकच्या ७५ अब्ज डॉलर्स उत्पादनांवर कर लादण्याचा निर्णय राजकीय हेतूंनी प्रेरित आहे’, असे बजावून ट्रम्प यांनी नव्या करांची घोषणा केली.
चीनवर दोन टप्प्यात कर लादण्यात येणार असून १ सप्टेंबरपासून चीनच्या ३०० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर १५ टक्के तर १ ऑक्टोबर पासून चीनच्या २५० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर ३० टक्के कर लादण्यात येईल, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे अमेरिकेत आयात होणार्या चीनच्या सर्व उत्पादनांवर कर लादले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेले काही महिने अमेरिका व चीनमध्ये व्यापारयुद्ध टाळण्यासाठी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेत चीन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी अतिरिक्त कर लादण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर चीनने आपले चलन युआनचे मूल्य कमी करून अमेरिकेला धक्का दिला दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी आता चीनबरोबरील चर्चेची शक्यता मावळल्याचे संकेत देऊन लवकरच नव्या कारवाईची घोषणा करू, असे स्पष्ट केले होते.
ट्रम्प यांनी कारवाई करण्यापूर्वीच चीनने अमेरिकेच्या उत्पादनांवर करांची घोषणा केल्याने अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी चीनच्या सर्व उत्पादनांवर कर लादण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. या घोषणेचे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतील
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |