पहिल्या ‘रशिया-आफ्रिका समिट’च्या पार्श्‍वभूमीवर – रशियाची दोन ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’ दक्षिण आफ्रिकेत दाखल

पहिल्या ‘रशिया-आफ्रिका समिट’च्या पार्श्‍वभूमीवर – रशियाची दोन ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’ दक्षिण आफ्रिकेत दाखल

सोची – रशियाची दोन ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर बॉम्बर्स’ बुधवारी दक्षिण आफ्रिकेतील हवाईतळावर दाखल झाली. रशियन न्यूक्लिअर बॉम्बर्सनी आफ्रिका खंडात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही घटना रशिया व आफ्रिकेतील वाढत्या सहकार्याचे संकेत असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येतो. रशियाच्या सोची शहरात राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ‘रशिया-आफ्रिका समिट’ सुरू असतानाच रशियन बॉम्बर्सची आफ्रिकेतील तैनाती लक्ष वेधून घेणारी ठरते.

                     

बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया शहरानजिक असणार्‍या ‘वॉटरक्लूफ एअरफोर्स बेस’वर रशियाची दोन ‘टयुपोलेव टीयू-१६०’ ही ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’ दाखल झाली. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संरक्षणविभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह रशियन दूतावासातील अधिकारीही उपस्थित होते. रशिया व दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या लष्करी सहकार्याचा भाग म्हणून ही ‘स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स’ दाखल झाल्याची माहिती यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

रशियन बॉम्बर्स आफ्रिका खंडात दाखल होण्याची घटना रशियाच्या आफ्रिकेतील वाढत्या प्रभावाचे संकेत देणारी असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येतो. रशियाच्या सोची शहरात सुरू झालेली पहिली ‘रशिया-आफ्रिका समिट’ही याचाच भाग असून अमेरिका व चीनपाठोपाठ रशिया या खंडात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यातून दिसून येत आहे.

सोचीतील ‘रशिया-आफ्रिका समिट’मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी घेतलेले निर्णय आणि रशिया व आफ्रिकी देशांमध्ये झालेले करार रशियाच्या ‘मिशन आफ्रिका’चा भाग असल्याचे विश्‍लेषकांकडून सांगण्यात येते. गेल्या काही वर्षात रशियाने अल्जेरिया, नायजेरिया, रवांडा, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक यासारख्या देशांमध्ये पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकसारख्या देशात रशियाच्या संरक्षणक्षेत्रातील खाजगी कंपनीची तुकडी तैनात होणे याचाच भाग असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

रशिया-आफ्रिका समिटमध्ये पुतिन यांनी यापूर्वी विविध आफ्रिकी देशांना देण्यात आलेली तब्बल २० अब्ज डॉलर्सची कर्जे माफ करण्यात येत असल्याचे जाहीर केले. २०१८ साली रशिया व आफ्रिका खंडातील व्यापार २० अब्ज डॉलर्सच्या आसपास होता. हे लक्षात घेता रशियन राष्ट्राध्यक्षांनी केलेली घोषणा महत्त्वाची मानली जाते. त्याचवेळी रशियाच्या अधिकार्‍यांनी आफ्रिकी देशांबरोबर अब्जावधी डॉलर्सचे संरक्षण करार करण्यात येत असल्याचीही माहिती दिली आहे.

यापूर्वी अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी आफ्रिकेत वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळविले असून आता रशिया त्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. दक्षिण आफ्रिकेतील न्यूक्लिअर बॉम्बर्सची तैनाती व रशिया-आफ्रिका समिट यातून याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे विश्‍लेषकांकडून सांगण्यात येते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info