चिलीतील आंदोलनाची तीव्रता वाढली – २४ जणांचा बळी, तीन हजारांहून अधिक जखमी

चिलीतील आंदोलनाची तीव्रता वाढली – २४ जणांचा बळी, तीन हजारांहून अधिक जखमी

सँटिआगो – चिलीचे राष्ट्राध्यक्ष सेबॅस्टिअन पिनेरा यांच्या धोरणांविरोधात सुरू झालेले आंदोलन अधिकच तीव्र होऊ लागले आहे. गेल्या आठवड्यात ‘मेट्रो’ रेल्वेच्या दरवाढीवरून सुरू झालेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले असून राजधानी सँटिआगोसह देशाच्या कानाकोपर्‍यात मोर्चे व संपाचे सत्र सुरू झाले आहे. या आंदोलनाने?लॅटिन अमेरिकेतील स्थिर व संपन्न देश ही चिलीची ओळख धुळीस मिळाली असून आर्थिक विषमतेचा मुद्दा अधिक ठळकपणे समोर आला आहे.

ऑक्टोबर महिन्यात चिलीतील पिनेरा सरकारने मेट्रो रेल्वेच्या दरात काही टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. चिलीतील अनेक शहरांमध्ये मेट्रोचे जाळे असून सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर या सेवेचा वापर करते. त्यामुळे या दरवाढीला मोठा विरोध झाला. मात्र राष्ट्राध्यक्ष पिनेरा यांनी सुरुवातीला दरवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.

मात्र निदर्शनांना अवघे काही दिवस उलटल्यानंतर राजधानीत जाहीर झालेली आणीबाणी व लष्करी तैनाती जनतेच्या असंतोषात अधिकच भर टाकणारी ठरली. गेल्या शतकातील लष्करी हुकुमशाहीचा अनुभव घेतलेल्या व ती उलथणार्‍या चिलितील जनतेकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यातून चिली सरकारने सुरक्षायंत्रणांचा केलेला आक्रमक वापर व त्यांच्याकडून झालेल्या चुका राष्ट्राध्यक्ष पिनेरा यांना अडचणीत आणणार्‍या ठरल्या.

आंदोलनाला एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर सरकारने आपला निर्णय मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र सुरुवातीच्या काळात झालेल्या कारवाईने आंदोलक अधिकच भडकले होते. त्यातच रेल्वे दरवाढीच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनात देशाची राज्यघटना, शिक्षण व आरोग्य आणि आर्थिक विषमतेचा मुद्दाही सामील करण्यात आला. यातून आंदोलनाची व्याप्ती अधिकच वाढत गेली.

लॅटिन अमेरिकेतील सर्वाधिक संपन्न देश ही ओळख असणार्‍या चिलीचे वेगळे चित्र समोर येत असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायातूनही दबाव येण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्रसंघासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वयंसेवी संघटनांनी चिलीतील सुरक्षायंत्रणा बळाचा प्रमाणाबाहेर वापर करीत असल्याचा ठपका ठेवल आहे.

आता जवळपास एक महिना उलटल्यानंतरही चिलितील आंदोलन शांत झाले नसून उलट ते अधिकच चिघळताना दिसत आहे. सरकारकडून त्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत २४ जणांचा बळी गेला असून तीन हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. हा मुद्दाही आंदोलकांनी उचलून धरला असून पिनेरा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचवेळी सुरक्षायंत्रणा व सरकारी उपक्रमांवर हल्ले सुरू झाले असून आंदोलकांकडून पेट्रोल बॉम्ब्सचा वापर सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लॅटिन अमेरिकेतील इतर काही देशांमध्ये सुरू असणारी सरकारविरोधी आंदोलनेही चिलीतील निदर्शकांना प्रेरणा देणारी ठरली असून अजून काही काळ ही धग कायम राहिल, असे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info