चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्याच्या हालचाली – ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेच्या माजी प्रमुखांचा इशारा

चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्याच्या हालचाली – ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेच्या माजी प्रमुखांचा इशारा

कॅनबेरा/बीजिंग – ऑस्ट्रेलियाची राजकीय व्यवस्था पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी चीन सरकार घातकी कारवाया करीत आहे, असा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेच्या माजी प्रमुखांनी केला. ऑस्ट्रेलियन सरकारमधील कोणतीही व्यक्ती चीनच्या या कुटील धोरणाचे लक्ष्य असू शकते आणि त्याचे परिणाम कळण्यास काही दशकांचा कालावधी लागेल, असेही ‘ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन’चे माजी प्रमुख डंकन लुईस यांनी बजावले आहे.

गेल्या काही महिन्यात व्यापार, ‘साऊथ चायना सी’ व ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्र’ यासह विविध मुद्यांवर ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनशी उघड संघर्षाची भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत चीनचे दडपण अथवा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचे बजावले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियात प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या चीनच्या सत्ताधारी राजवटीत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राजकीय व्यवस्था, नियंत्रण, डंकन लुईस, गुप्तचर यंत्रणा, चीन, ऑस्ट्रेलिया, स्कॉट मॉरिसन

चीन गेल्या काही वर्षांपासून महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून जगाच्या कानाकोपर्‍यात आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी हालचाली करीत आहेत. यात आर्थिक व व्यापारी सामर्थ्याचा वापर, प्रसारमाध्यमे व सोशल मीडिया यासह गुप्तचर कारवायांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियात चीनच्या हस्तक्षेपावरून गेली काही वर्षे असंतोष वाढत असून राजकीय नेते, विश्‍लेषक, गुप्तचर अधिकारी व सरकारी यंत्रणांकडूनही याबाबत सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. लुईस यांचा इशाराही याचाच भाग आहे.

‘ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमे, उद्योग क्षेत्र, समाज व राजकीय क्षेत्रात चीनच्या यंत्रणांना प्रभावशाली स्थान निर्माण करायचे आहे. त्यासाठी हस्तक्षेप व हेरगिरीचा वापर करण्यात येत असून हा विश्‍वासघात आहे. याचे परिणाम कदाचित आता दिसणार नाहीत, अनेक दशकांनी दिसतील; पण त्यावेळी खूपच उशीर झालेला असेल. ऑस्ट्रेलियन जनता एक दिवस झोपेतून उठेल आणि तिला जाणीव होईल की आपल्या देशात घेण्यात येणारे निर्णय आपल्या देशाच्या हिताचे नाहीत’, अशा थेट शब्दात ‘ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन’चे माजी प्रमुख डंकन लुईस यांनी चीनविरोधात धोक्याचा इशारा दिला.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियातील निवडणुकांमध्ये ‘लिबरल’ पक्षाचे स्कॉट मॉरिसन यांची पंतप्रधानपदी झालेली फेरनिवडही चीनला धक्का देणारी असल्याची प्रतिक्रिया चीनच्या वर्तुळातून उमटली होती. त्यानंतर गेल्याच महिन्यात चीनचे ऑस्ट्रेलियातील राजदूत चेंग जिंगये यांनी, ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक प्रगतीमागे चीनचा विकास आणि चीन व ऑस्ट्रेलियामधील व्यापारी, आर्थिक तसेच इतर क्षेत्रांमधील सहकार्य हा प्रमुख घटक आहे याची जाणीव ठेवा, अशा शब्दात ऑस्ट्रेलियन नेतृत्त्वाला बजावले होते.

या पार्श्‍वभूमीवर, ऑस्ट्रेलियाच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी दिलेला इशारा दोन देशांमधील तणाव अधिक चिघळत असल्याचे स्पष्ट संकेत देणारा ठरतो.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info