कॅनबेरा/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून ऑस्ट्रेलियाच्या राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या कारवायांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चिनी हेराकडून देण्यात आलेली माहिती व सुरू असलेल्या कारवाया या गोष्टी अत्यंत धक्कादायक तसेच चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. चीनने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले असून ऑस्ट्रेलियात आश्रय मागणारा हेर ‘फ्रॉड’ असल्याचा दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वीच, चीन सरकार व गुप्तचर यंत्रणा ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्ये कशा रितीने राजकीय तसेच इतर क्षेत्रात हस्तक्षेप करीत आहेत, याचा गौप्यस्फोट एका चिनी गुप्तहेराने केला होता. वँग ‘विल्यम’ लिकिआंग असे या हेराचे नाव असून सदर अधिकार्याने ऑस्ट्रेलियाकडे आश्रयाचीही मागणी केली होती. या गुप्तहेराने ऑस्ट्रेलियाची गुप्तचर यंत्रणा ‘ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन’ याबाबत पूर्ण माहिती दिल्याचेही समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील ‘नाईन टेलिव्हिजन’ सादर केलेल्या एका कार्यक्रमात चीनच्या गुप्तहेरांकडून ऑस्ट्रेलियातील राजकीय पक्षाच्या सदस्यांना कशा रितीने आमिषे दाखवून जाळ्यात खेचले जात आहे, याची माहिती देणारे वृत्त दिले. यात काही महिन्यांपूर्वी हत्या झालेल्या निक झाओ या सत्ताधारी लिबरल पार्टीच्या सदस्याचाही उल्लेख आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांचा हा दावा राजकीय वर्तुळाला हादरा देणारा ठरला.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देताना समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले. त्याचवेळी याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचेही जाहीर केले. ऑस्ट्रेलियाची गुप्तचर यंत्रणा ‘ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन’ ने याचा तपास सुरू केला असून त्यातील माहिती संसद तसेच जनतेसमोर मांडण्यात येईल, असे पंतप्रधान मॉरिसन यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षभरापासून व्यापार, ‘साऊथ चायना सी’ व ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्र’ यासह विविध मुद्यांवर ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनशी उघड संघर्षाची भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत चीनचे दडपण अथवा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचे बजावले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियात प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करणार्या चीनच्या सत्ताधारी राजवटीत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाची राजकीय व्यवस्था पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी चीन सरकार घातकी कारवाया करीत आहे, असा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेच्या माजी प्रमुखांनी नुकताच केला होता. ऑस्ट्रेलियन सरकारमधील कोणतीही व्यक्ती चीनच्या या कुटील धोरणाचे लक्ष्य असू शकते आणि त्याचे परिणाम कळण्यास काही दशकांचा कालावधी लागेल, असेही ‘ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन’चे माजी प्रमुख डंकन लुईस यांनी बजावले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |