रशियन सॅटेलाईट्सकडून अमेरिकन सॅटेलाईटचा पाठलाग – अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’च्या प्रमुखांची माहिती

रशियन सॅटेलाईट्सकडून अमेरिकन सॅटेलाईटचा पाठलाग – अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’च्या प्रमुखांची माहिती

वॉशिंग्टन – लष्करी, सागरी व हवाई क्षेत्राबरोबरच अंतराळ क्षेत्रातही अमेरिका व रशिया यांच्यात तणाव असल्याचे समोर आले आहे. ‘रशियाच्या दोन सॅटेलाईट्सनी आमच्या स्पाय सॅटेलाईटचा पाठलाग केला. या खतरनाक पाठलागामुळे अंतराळ क्षेत्रातील अमेरिकेच्या वर्चस्वाला रशियाकडून असलेला धोका वाढला आहे’, असा आरोप अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’चे प्रमुख ‘जनरल जॉन रेमंड’ यांनी केला. रशियाप्रमाणे चीनकडूनही अंतराळातील आपल्या हितसंबंधांना धोका असल्याची टीका अमेरिकेने याआधी केली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘स्पेस फोर्स कमांड’च्या प्रमुखपदी निवडलेले जनरल जॉन रेमंड यांनी अमेरिकी मासिकाशी बोलताना याची माहिती दिली. यासाठी जनरल रेमंड यांनी नोव्हेंबर महिन्यातील घटनेचा दाखला दिला. नोव्हेंबर महिन्यात रशियाने ‘कॉसमॉस २५४२’ या सॅटेलाईटचे प्रक्षेपण केले होते. दोन आठवड्यानंतर या सॅटेलाईटमधून ‘कॉसमॉस २५४३’ हा नावाचा सॅटेलाईट प्रक्षेपित झाला. या दोन्ही सॅटेलाईट्सनी अमेरिकेच्या ‘युएसए २४५’ सॅटेलाईटचा पाठलाग सुरू केला.

रशियन सॅटेलाईट्स अमेरिकेच्या सॅटेलाईट्सचा केवळ पाठलाग करीत नव्हते, तर ते अमेरिकी सॅटेलाईट्सच्या दिशेने धोकादायकरित्या प्रवासही करीत होते. यातील एका सॅटेलाईटने १०० मैल अंतराजवळून प्रवास केल्याचा आरोप जनरल रेमंड यांनी केला.

‘युएसए २४५’ अमेरिकेच्या चार अतिप्रगत टेहळणी सॅटेलाईट्सपैकी एक आहे. या सॅटेलाईट्सचे सेंसर्स आणि कॅमेराज् अमेरिकेच्या शत्रूदेशांवर रोखलेले आहे. त्यामुळे या सॅटेलाईटचा पाठलाग करून रशियाने अमेरिकेच्या अंतराळातील हितसंबंधांना धोका असल्याची जाणीव करून दिली असे जनरल रेमंड यांनी म्हटले आहे.

‘ही एक साधारण घटना ठरत नाही. रशियन सॅटेलाईट्सच्या या पाठलागामुळे अंतराळात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते’, असा इशारा जनरल रेमंड यांनी अन्य वृत्तसंस्थेशी बोलताना दिला. त्याचबरोबर रशियाच्या अंतराळातील या हालचाली चिंताजनक असून जबाबदार देशाकडून अशा कारवाईची अपेक्षा नाही, अशी टीका अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’च्या प्रमुखांनी केली.

अंतराळातील आपल्या सॅटेलाईट्स व हितसंबंधांना रशिया आणि चीनकडून धोका असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी केला होता. व्हाईट हाऊस, पेंटॅगॉन आणि अमेरिकन काँग्रेसमधील ट्रम्प यांच्या समर्थकांनी देखील रशिया व चीनच्या या धोक्याबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या दशकभरात रशिया व चीनने उपग्रहभेदी क्षेपणास्त्रांची घेतलेल्या चाचण्यांचा दाखला दिला होता.
या पार्श्‍वभूमीवर, दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच अंतराळात सुरू असलेल्या या धोकादायक हालचालींची माहिती उघड झाली आहे. अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’ने रशियाकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या या आरोपांवर रशियाकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘कॉसमॉस २५४२’ या सॅटेलाईटमधून छुप्या सॅटेलाईटचे प्रक्षेपण झाल्याचे व त्यामुळे काही काळ अंतराळात तणाव निर्माण झाल्याची कबुली रशियाने दिली आहे.

सॅटेलाईट्सच्या सुरक्षेसाठी अमेरिकेची ‘स्पेस फेन्स’ सज्ज

अंतराळातील आपल्या उपग्रहांच्या सुरक्षेसाठी तयार केलेली ‘स्पेस फेन्स’ लवकरच कार्यान्वित होणार असल्याची घोषणा अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’ने केली. अंतराळात प्रवास करणार्‍या चार इंचाच्या आकाराची वस्तू देखील हुडकून काढण्याची क्षमता या ‘स्पेस फेन्स’च्या रडारमध्ये आहे.

अंतराळात प्रवास करणार्‍या आणि आपल्या सॅटेलाईट्ससाठी धोकादायक ठरणार्‍या पदार्थांचा शोध काढण्यासाठी अमेरिकेची रडार यंत्रणा आधीपासून कार्यरत आहे. पण ‘स्पेस फोर्स’च्या अंतर्गत अमेरिकेचे अंतराळ धोरण अधिक व्यापक झाले आहे. यासाठी छोट्यातील छोट्या आकाराच्या वस्तूंवरही नजर ठेवणारी आणि अंतराळातील धोक्यांची सूचना देणारी ‘स्पेस फेन्स’ यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सज्ज असल्याचे ‘स्पेस फोर्स’ने जाहीर केले.

पॅसिफिक महासागरातील मार्शल द्विपसमुहाच्या ‘काएलिन अटोल’ या बेटावर ‘स्पेस फेन्स’ची रडार यंत्रणा तैनात असेल. या स्पेस फेन्समुळे अंतराळातील सॅटेलाईट्समधील टकराव रोखता येईल तसेच शत्रूदेशांच्या सॅटेलाईट्सवरही नजर ठेवता येईल, असा दावा केला जातो.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info