दोहा – कतारची राजधानी दोहा इथे अमेरिका आणि तालिबानमधील शांतीकरार संपन्न झाला. या करारानुसार अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची तालिबानची मागणी मान्य केली आहे. तर तालिबाननेही हिंसा थांबविण्याचे मान्य केले असून पुढच्या काळात अफगाणिस्तानात सर्वपक्षीय चर्चेत तालिबानही सहभागी होणार आहे. या चर्चेतच सदर शांतीकराराचे भवितव्य ठरेल. त्यामुळे आत्ताच या करारामुळे अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होईल, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
अमेरिकेचे अफगाणिस्तानसाठी नियुक्त करण्यात आलेले विशेषदूत झल्मे खलिलजाद व तालिबानचे प्रतिनिधी मोहम्मद नईम यांच्यात हा करार संपन्न झाला. या कार्यक्रमात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ सहभागी झाले. तसेच भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि इंडोनेशिया या देशांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. या करारानुसार अमेरिका अफगाणिस्तानातील आपले सैन्य माघारी घेणार आहे. तालिबाननेही अफगाणिस्तानच्या सरकारसह सर्वांशीच चर्चा करण्याची मागणी मान्य करून हिंसाचार रोखण्याची कबुली दिली आहे. अमेरिका, तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सरकारने तडजोड करण्याची तयारी दाखविल्यानेच हा करार संपन्न झाला. पण या कराराची अंमलबजावणी ही सर्वात अवघड बाब असल्याचे निरीक्षक सांगत आहेत.
अफगाणिस्तानात सध्या अमेरिकेचे १३ हजार सैनिक तैनात आहे. ही संख्या ८६०० वर आणण्याची तयारी अमेरिकेने केली आहे. मात्र पूर्णपणे सैन्यमाघारीसाठी अमेरिकेवर कुणाचेही दडपण असू शकत नाही, असा दावा अमेरिकेेचे लष्करी अधिकारी करीत आहेत. तर दुसर्या बाजूला तालिबानचे नेते मात्र हा करार म्हणजे आपला विजय असल्याचे दावे ठोकत आहेत.
अमेरिका सैन्यमाघारीसाठी तयार झाली, यातच आपला विजय सामावलेला असल्याचे तालिबानचे म्हणणे असून तालिबानचे समर्थक तर या युद्धात अमेरिका पराभूत झाली, असे दावे ठोकू लागले आहेत.
पण प्रत्यक्षात हा अमेरिकेचा पराभव ठरत नाही, असे काही निरीक्षक ठासून सांगत आहेत. अमेरिकेने संपूर्ण सैन्यमाघारीची तालिबानची शर्त मानलेली नाही. तसेच अफगाणिस्तानात अमेरिकेचे भव्य लष्करी तळ असून अमेरिका ते खाली करण्यास तयार नाही, हीच सर्वात महत्त्वाची बाब ठरते, याकडे हे निरीक्षक लक्ष वेधत आहेत. अफगाणिस्तानात सध्या सत्तेवर असलेले सरकार पाश्चिमात्यांच्या तालावर नाचणारे असून त्याला कुठल्याही प्रकारची वैधता दिली जाऊ शकत नाही, अशी तालिबानची भूमिका होती. ती मागे घेऊन आता तालिबानला अफगाणी सरकारबरोबर चर्चा करावी लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या एका दैनिकामध्ये तालिबानचा प्रमुख नेता असलेल्या सिराजुद्दीन हक्कानी याचा लेख प्रसिद्ध झाला होता. अफगाणिस्तानात सुरू असलेल्या युद्धाने सर्वचजण थकून गेले आहेत, हे हक्कानीने या लेखाद्वारे मान्य केले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही या युद्धात आपल्या देशाला फार मोठी हानी सोसावी लागली, याकडे लक्ष वेधून हे युद्ध थांबविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे वारंवार स्पष्ट केले होते. मात्र या युद्धात आपला पराभव झाला किंवा आपण संपूर्ण माघार घेण्यास तयार झालो आहोत, हे अमेरिका किंवा तालिबान यापैकी कुणीही मान्य करायला तयार नाही.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |