कोरोनाच्या साथीसाठी ‘फाईव्ह आईज’ देशांकडून चीनवर ठपका

कोरोनाच्या साथीसाठी ‘फाईव्ह आईज’ देशांकडून चीनवर ठपका

वॉशिंग्टन – चीनकडून कोरोना साथीची जबाबदारी नाकारण्यासाठी जोरदार प्रचारमोहिम चालू असतानाच आंतरराष्ट्रीय समुदायानेही चीनवरील दडपण वाढविण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत.अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा गट म्हणून ओळख असणाऱ्या ‘फाईव्ह आईज’नेही कोरोनाव्हायरसच्या साथीसाठी चीनच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. जगातील प्रमुख देशांच्या यंत्रणा चीनकडे बोट दाखवित असतानाच युरोपकडूनही कोरोना साथीच्या मुद्यावर चौकशीची मागणी समोर आली आहे. त्यामुळे आता चीन अधिकाधिक अडचणीत येत आहे.

कोरोना साथीच्या संकटाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याप्रमाणात साथीचा उगम असणाऱ्या चीनविरोधातील नाराजीही अधिकाधिक व्यापक रूप धारण करीत आहे. सुरूवातीच्या काळात फक्त अमेरिकेकडून साथ फैलावण्यासाठी चीनला लक्ष्य केले जात होते. मात्र आता साथीसाठी चीनला जबाबदार धरणाऱ्या तसेच चीनच्या राजवटीला सवाल करणाऱ्या देशांची संख्या वाढू लागली आहे.

गेल्या काही दिवसात कोरोनाची साथ पसरविल्याबद्दल चीनकडून नुकसानभरपाईचीही मागणी होत असल्याच्या बातम्या समोर आल्या आल्या आहेत. यात अमेरिका व ब्रिटनसारख्या देशांबरोबरच चीनचे समर्थन करणाऱ्या जर्मनीसारख्या आघाडीच्या देशाचाही समावेश आहे. ही बाब चीनवरील आंतरराष्ट्रीय दडपण वाढत असल्याचे संकेत मानले जातात.

याच पार्श्वभूमीवर ‘फाईव्ह आईज अलायन्स’ या गुप्तचर यंत्रणांच्या गटाच्या अहवालाची बातमी समोर येणे महत्त्वाचे ठरते. या गटात अमेरिकेसह ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांचा समावेश असून हा गट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्थापन करण्यात आला होता.

‘चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने वुहानच्या प्रयोगशाळेतील पुरावे नष्ट केले. कोरोना साथीवर लस विकसित करण्याचे प्रयत्न करणाऱ्या संशोधकांना विषाणूंचे जिवंत नमुने देण्याचे नाकारण्यात आले. जानेवारी महिन्यात चीनच्या यंत्रणा कोरोना विषाणू माणसांमध्ये पसरू शकतो, हेदेखील नाकारत होत्या. या सर्व घटना चीनकडून कोरोना साथीचे वास्तव जाणूनबुजून दडपण्याचा कट होता’, असा ठपका ‘फाईव्ह आईज’च्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

चीनवर ठपका ठेवत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेलाही फटकारण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यातच मानवी संसर्गातून साथ पसरते हे माहीत असतानाही आरोग्य संघटनेने चीनचे समर्थन करणे सुरू ठेवले होते, अशी नाराजी अहवालात व्यक्त करण्यात आली.

फाईव्ह आईजच्या अहवालापाठोपाठ गेली काही वर्षे विविध मुद्यांवर चीनच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या युरोपनेही कोरोना साथीच्या चौकशीची मागणी पुढे केली आहे. युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला लेयन यांनी एका मुलाखतीत कोरोना साथीच्या तपासाची व त्यात चीननेही सहभागी व्हावे, असे वक्तव्य केले. पुढची साथ कधी येईल माहित नाही, पण त्यासाठी आताच्या परिस्थितीतून धडे घ्यायला हवेत, अशा शब्दात युरोपियन कमिशनच्या प्रमुखांनी कोरोनाच्या चौकशीची मागणी केली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info