सेउल – रविवारी पहाटे उत्तर व दक्षिण कोरियाच्या लष्करादरम्यान सीमेवर चकमक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. २०१८ सालानंतर अशी लष्करी चकमक होण्याची ही पहिलीच घटना आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन जगासमोर आल्यानंतर २४ तासांच्या आत ही चकमक घडल्याने याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले.
एप्रिल महिन्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन काही सरकारी व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध वावड्या उठण्यास सुरुवात झाली होती. काही प्रसारमाध्यमे तसेच विश्लेषकांनी किम जाँग यांचा मृत्यू झाल्याचेही दावे केले होते. त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया फसल्याचे व त्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचे त्यात सांगण्यात आले होते.
मात्र दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम यांच्या मृत्यूबाबतचे दावे फेटाळले होते. त्यानंतर शुक्रवारी उत्तर कोरियाच्या माध्यमांकडून किम जाँग उन यांचे फोटोज प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात किम एका फॅक्टरीचे उद्घाटन करताना दाखविण्यात आले होते.
या फोटॊनंतर किम यांच्या मृत्यू बाबतच्या चर्चा थांबल्या असतानाच कोरियन सीमेवरील लष्करी चकमकीचे वृत्त समोर आले आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास उत्तर कोरियाच्या लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दक्षिण कोरियाच्या लष्करानेही गोळीबार केला. त्यानंतर उत्तर कोरियाच्या लष्कराने गोळीबार थांबवला. चकमकीत दोन्ही बाजूंची कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
पहाटेच्या चकमकीनंतर दिवसभरात सीमेवर कोणत्याही प्रकारची घटना घडली नाही, असे दक्षिण कोरियाकडून स्पष्ट करण्यात आले. उत्तर कोरियाच्या माध्यमांमध्ये या चकमकीचा कोणताही उल्लेख नाही. अमेरिकेने यावर प्रतिक्रिया देताना, सदर चकमक अपघात असावा, असे म्हटले आहे.
अचानक झालेल्या चकमकीच्या घटनेने दोन देशांमधील सीमेवर असणारा तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |