बगदाद/दमास्कस – गेल्या दोन दिवसांमध्ये ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी इराक आणि सिरियामध्ये चढविलेल्या हल्ल्यांमध्ये ४५ जणांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांनी सिरियातील दोन इंधन प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यानंतर इराकच्या लष्कराने ‘आयएस’विरोधात मोहीम छेडली आहे. इराक आणि सिरियन सरकार कोरोनाव्हायरसशी लढत असल्याचा फायदा घेत ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी हल्ले तीव्र केल्याचा दावा केला जातो.
गेल्या काही दिवसांपासून इराक आणि सिरियात ‘आयएस’च्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी इराकच्या सलाहुद्दीन प्रांतात चढविलेल्या हल्ल्यात दहा जण ठार झाले. इराकमधील इराणसंलग्न ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ या गटावर हा हल्ला झाला होता. तर या हल्ल्याच्या काही तास आधी इराकमधील इंधनसंपन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरकूक भागात ‘आयएस’च्या दहशतवाद्याने चढविलेल्या आत्मघाती हल्ल्यात दोन सुरक्षा जवान ठार झाले.
तर गेल्या दोन दिवसांपासून ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियाच्या होम्स भागात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये सिरियन लष्कराचे किमान ३२ सैनिकांचा बळी गेला. या हल्ल्यात होम्समधील दोन इंधन प्रकल्पांचे जबर नुकसान झाले. यामुळे सदर भागातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. या व्यतिरिक्त सिरियातील तुरुंगातून ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी पलायन केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सिरियातील अस्साद राजवटीच्या चिंता वाढल्या आहेत.
इराक आणि सिरियामध्ये कोरोनाव्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. इराकमध्ये या साथीने ९५ जणांचा बळी घेतला असून या देशात कोरोनाचे २,२१९ रुग्ण आहेत. तर सिरियामध्ये या साथीने तीन जण दगावले असून ४४ जणांना या साथीची लागण झाली आहे. कोरोनाव्हायरस विरोधात सुरू असलेल्या या लढ्याच्या पार्श्वभूमीवर इराक आणि सिरियामध्ये संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. पण ‘आयएस’ने या परिस्थितीचा फायदा घेत इराक आणि सिरियात पुन्हा आपला प्रभाव वाढविण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |