रियाध/कुवैत – इंधनदरांमध्ये होणारी घसरण व गुंतवणुकीत झालेली घट यामुळे कुवैतच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्के बसणार असून यापुढे फक्त कच्च्या तेलावर अवलंबून राहता येणार नाही, असे कुवैतचे प्रमुख ‘शेख सबाह अल-अहमद अल-सबाह यांनी बजावले आहे. कुवैतची ५० टक्क्यांहून अधिक अर्थव्यवस्था इंधनावर अवलंबून आहे. कुवैतचे प्रमुख आर्थिक धक्क्यांबाबत चिंता व्यक्त करीत असतानाच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्लेषकांनीही आखाती देशांबाबत भाकिते वर्तविण्यास सुरुवात केली असून कोरोना साथीपेक्षा इंधनदरांच्या घसरणीचा फटका मोठा असू शकतो, असे इशारेही दिले आहेत.
जागतिक स्तरावर इंधनाचे दर सध्या २० ते ३० डॉलर्स प्रति बॅरल बॅरलपर्यंत घसरले आहेत. कोरोनाव्हायरसची साथ अद्याप नियंत्रणात आली नसून पुढील वर्षापर्यंत त्याचा प्रभाव कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. याचे धक्के आखाती देशांना बसणार असून त्यांना आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय परिणामांना सामोरे जावे लागेल, असे दिसु लागले आहे.
कुवैत हा आखाती देशांमधील इंधनावर अवलंबून असणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक आहे. फक्त कच्च्या तेलावर विसंबता येणार नाही, हे त्या देशाच्या प्रमुखांचे वक्तव्य आखातातील बहुतांश इंधन अर्थव्यवस्थांचे वास्तव दर्शविणारे आहे. २०१४ व त्यानंतरच्या काळातही इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यावेळीच बहुतांश इंधनसंपन्न आखाती देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईस येण्यास सुरुवात झाली होती.
मात्र नंतरच्या काळात दरांमध्ये वाढ होऊन स्थिती सुधारेल, असा विश्वास आखाती नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला होता. पण सध्या आखातातील नेतृत्त्व इंधनक्षेत्रात सकारात्मक बदलांऐवजी इंधनाव्यतिरिक्त अर्थव्यवस्था चालविण्याबाबत वक्तव्ये करीत आहेत. यामागे तेलाच्या दरांमधील घसरणीने अर्थव्यवस्थेला बसलेले धक्के हे प्रमुख कारण असल्याचे दिसते.
सौदी अरेबिया या प्रमुख देशातील परकीय गंगाजळी दशकातील नीचांकी पातळीवर घसरली आहे. या वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत सौदी अर्थव्यवस्थेतील आर्थिक तूट ९ अब्ज डॉलर्सच्या वर गेली आहे. संयुक्त अरब अमिरातीने सर्व सरकारी विभागांमध्ये भरती थांबवली आहे. कतारसारख्या देशाने जवळपास आठ अब्ज डॉलर्सहून मूल्याच्या प्रकल्पाना स्थगिती दिली आहे. तर इराकसारख्या देशाची अर्थव्यवस्था यावर्षी जवळपास १० टक्क्यांनी कोसळेल, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे.
अर्थव्यवस्थेला बसलेले हे धक्के म्हणजे सुरुवात असून सामाजिक व राजकीय परिणाम अद्याप पूर्णपणे समोर आलेले नाहीत. इराक व लेबेनॉन या देशांमध्ये सुरू असलेली निदर्शने सर्व आखाती देशांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या साथीची माहिती पुढे येण्यापूर्वीच आखातातील काही अभ्यासकांनी दुसऱ्या ‘अरब स्प्रिंग’ला पोषक ठरेल अशी स्थिती तयार झाल्याचे इशारे दिले होते. तेलाच्या दरांमधील घसरणीने त्याला अधिक वेग मिळेल, असे दिसू लागले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |