चीनचे आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांवर सायबरहल्ले – इस्रायली कंपनीचा अहवाल

चीनचे आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांवर सायबरहल्ले – इस्रायली कंपनीचा अहवाल

तेल अविव – चीनच्या लष्कराशी संबंध असलेल्या ‘नायकॉन’ या हॅकर्सच्या गटाकडून प्रगत ‘सायबरवेपन्स’च्या सहाय्याने आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांवर सायबरहल्ले होत असल्याचा दावा इस्रायली कंपनीने केला. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान कार्यालयावर झालेल्या सायबरहल्ल्यादरम्यान ही बाब उघडकीस आल्याचे इस्रायली कंपनीने म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिकेने ‘कोरोना लसी’च्या संशोधनाची माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्याच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करण्याच्या हालचालीही सुरू केल्याचे वृत्त अमेरिकी दैनिकाने दिले आहे.

इस्रायलच्या ‘चेकपॉइंट’ या सायबरसुरक्षा कंपनीने चीनच्या सायबरहल्ल्यांबाबत नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात चीनच्या लष्कराशी संबंध असलेल्या ‘नायकॉन’ या हॅकर्सच्या गटाचा उल्लेख आहे. या गटाने ‘अरिया-बॉडी’ नावाने प्रगत ‘सायबरवेपन’ विकसित केल्याचे इस्रायली अहवालात सांगण्यात आले.

‘चीनचे हे सायबरवेपन ‘मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट्स’च्या माध्यमातून कॉम्प्युटरमध्ये शिरकाव करते. त्यानंतर त्यातील सर्व फाईल्सची माहिती मिळवते व हव्या त्या फाईल्स हॅक करते. कॉम्प्युटर वापरणाऱ्या व्यक्तीकडून सुरु असणाऱ्या कामावर नजर ठेवण्याची क्षमता या सायबरवेपनमध्ये आहे’, अशी माहिती इस्रायली कंपनीने आपल्या अहवालात दिली आहे.

चिनी हॅकर्सच्या गटाने या सायबरवेपनच्या सहाय्याने ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड यासारख्या देशांवर सायबरहल्ले केले, असा दावा ‘चेकपॉइंट’ या कंपनीने केला. ‘कॅस्परस्की’ या रशियन सायबरसुरक्षा कंपनीनेही चिनी हॅकर्सकडून गेली पाच वर्षे आशियाई देशांवर सायबरहल्ले सुरु असल्याचे म्हटले आहे.

इस्रायली कंपनीकडून चीनच्या सायबरहल्ल्यांची माहिती समोर येत असतानाच अमेरिकेतही या मुद्यावर चीनला लक्ष्य करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’ व ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ यांनी चीनच्या सायबरहल्ल्यांबाबत स्वतंत्र अहवाल तयार केला आहे. त्यात, चीन कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या लसीची माहिती सायबरहल्ले करून चोरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारावर अमेरिका चीनला ‘वॉर्निंग’ देणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. अमेरिकी माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info