उघुरांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून अमेरिकेकडून चीनच्या ११ कंपन्या ‘ब्लॅकलिस्ट’

उघुरांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून अमेरिकेकडून चीनच्या ११ कंपन्या ‘ब्लॅकलिस्ट’

वॉशिंग्टन – उघुरवंशीयांचा गुलाम कामगारांप्रमाणे वापर करणाऱ्या ११ चिनी कंपन्यांना अमेरिकेने ‘ब्लॅकलिस्ट’ केले आहे. या कंपन्यांमध्ये अमेरिकेतील ‘ॲपल’, ‘ॲमेझॉन’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘टॉमी हिलफिगर’ यासारख्या मोठ्या कंपन्यांना कच्चा माल व उत्पादने पुरविणाऱ्या चिनी कंपन्यांचा समावेश आहे. दोन आठवड्यांपूर्वीच, चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट उघुरवंशीयांचा गुलाम कामगार म्हणून वापर करीत असून, चीनमधून आपली उत्पादने तयार करून घेणाऱ्या अमेरिकी कंपन्यांनी चिनी कंपन्या व राजवटीबरोबरील संबंधांचा फेरविचार करावा, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिला होता.

‘चीनची राजवट जबरदस्तीने उघुरवंशीयांचा गुलाम कामगार म्हणून वापर करीत आहे. उघुरवंशीयांना संपवण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणून जनुकीय चाचण्या केल्या जात आहेत व निर्बंध लादले जात आहेत’, अशा शब्दात चीनवर टीकास्त्र सोडून अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांनी चिनी कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकत असल्याची घोषणा केली. उघुरवंशीयांवरील अत्याचार व मानवाधिकार उल्लंघनाच्या मुद्द्यावर चिनी कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने चीनमधील ३७ कंपन्या व यंत्रणांना ‘ब्लॅकलिस्ट’ केले आहे.

सोमवारी जाहीर केलेल्या यादीत, ‘नानचँग ओ-फिल्म टेक’, ‘बीजिंग जिनॉमिक्स इन्स्टिट्यूट’शी निगडित दोन उपकंपन्या, ‘केटीके ग्रुप कं.’, ‘तानयुआन टेक्नॉलॉजी कं.’, ‘चँगजी एस्केल टेक्सटाईल कं.’, ‘हेतिअन हाओलिन हेअर ॲक्सेसरीज् कं.’ यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. यातील ‘नानचँग ओ-फिल्म टेक’ ही चीनमधील आघाडीची तंत्रज्ञानविषयक कंपनी असून या कंपनीकडून अमेरिकेतील ॲपल, ॲमेझॉन व मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या कंपन्यांना उत्पादने पुरविली जातात. ॲपलचे प्रमुख टीम कुक यांनी, डिसेंबर २०१७ मध्ये या चिनी कंपनीच्या फॅक्टरीला भेटही दिली होती. तर ‘चँगजी एस्केल टेक्सटाईल कं.’ या कंपनीकडून ‘टॉमी हिलफिगर’ ही अमेरिकी कंपनी आपली उत्पादने तयार करून घेते.

चीनकडून गेली काही वर्षे झिंजिआंग प्रांतातील इस्लामधर्मिय उघुरवंशियांचा सातत्याने छळ सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची दखल घेण्यात आली आहे. २०१८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात चीनने तब्बल ११ लाख उघुरवंशियांना छळछावण्यांमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला होता. या अहवालानंतर पाश्‍चिमात्य देशांनी उघुरांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. उघुरवंशीयांवरील अत्याचारांविरोधातही ट्रम्प प्रशासनाने गेल्या काही महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

जून महिन्यात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘उघुर ह्युमन राईट्स ॲक्ट’वर स्वाक्षरी केली होती. उघुरवंशियांशी निगडित या कायद्यात चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध लादण्याची तरतूद आहे. चीनचे जे अधिकारी उघुरांवरील कारवाईत सामील आहेत, त्या सर्वांना या कायद्याद्वारे लक्ष्य करण्यात आले आहे. यात, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे झिंजिआंग प्रांताचे प्रमुख ‘शेन क्वांगुओ’ यांचा समावेश आहे. शेन चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सामर्थ्यशाली ‘पॉलिटब्युरो’चे सदस्य आहेत. यापूर्वी मे महिन्यात तसेच गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेने उघुरवंशियांवरील अत्याचारात सहभागी असणाऱ्या चिनी कंपन्या व सरकारी यंत्रणाविरोधात निर्बंधांची कारवाई केली होती.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info